Canada PM Justin Trudeau : कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांना २८ ऑक्‍टोबरपर्यंत त्‍यागपत्र देण्‍याची मुदत !

ट्रुडो यांच्‍या लोकप्रियतेत घट झाल्‍याने त्‍यांच्‍या लिबरल पक्षाच्‍या खासदारांनीच दिली चेतावणी

कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो

ओटावा (कॅनडा) – भारतासमवेच्‍या चालू असलेल्‍या वादाच्‍या पार्श्‍वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांना त्‍यांच्‍याच पक्षात घेरण्‍यात आले आहे. ट्रुडो यांच्‍या पक्षाच्‍या खासदारांनी त्‍यांना चौथ्‍यांदा निवडणूक न लढवण्‍यास आणि पदाचे त्‍यागपत्र  देण्‍यास सांगितले आहे. एवढेच नाही, तर पक्षाच्‍या खासदारांनी ट्रुडो यांना याविषयी निर्णय घेण्‍यासाठी २८ ऑक्‍टोबरची मुदत दिली आहे. २८ ऑक्‍टोबरपर्यंत ट्रुडो यांनी पायउतार होण्‍याचा निर्णय घेतला नाही, तर त्‍यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही काही खासदारांनी म्‍हटले आहे.

लोकप्रियतेत घसरण झाल्‍याने ट्रुडो यांच्‍या त्‍यागपत्राची मागणी

कॅनडात जस्‍टिन ट्रुडो आणि त्‍यांचा पक्ष यांच्‍या लोकप्रियतेत मोठी घसरण झाली आहे. यामुळेच ट्रुडो यांच्‍यावर पंतप्रधानपदाचे त्‍यागपत्र देण्‍यासाठी दबाव टाकला जात आहे. अलीकडेच जस्‍टिन ट्रुडो यांनी त्‍यांच्‍या पक्षाच्‍या नेत्‍यांची बैठकही घेतली. या बैठकीनंतर ट्रुडो म्‍हणाले होते की, ‘लिबरल पक्ष भक्‍कम आणि एकसंध आहे.’ प्रत्‍यक्षात  पक्षाच्‍या २० खासदारांनी वेगळीच कथा सांगितली. या खासदारांनी पत्र लिहून ट्रुडो यांना पंतप्रधानपदाचे त्‍यागपत्र देण्‍यास सांगितले आहे. या खासदारांनी पुढील निवडणुकीपूर्वी त्‍यागपत्र देण्‍याची मागणी केली आहे.

ट्रुडोला विरोध करणारे खासदार काय म्‍हणाले ?

केन मॅकडोनाल्‍ड

कॅनडाच्‍या लिबरल पक्षाचे खासदार केन मॅकडोनाल्‍ड म्‍हणाले की, ट्रुडो यांनी इतरांचे ऐकायला प्रारंभ केला पाहिजे आणि लोकांचे ऐकले पाहिजे. केन मॅकडोनाल्‍ड त्‍या २० खासदारांपैकी आहेत, ज्‍यांनी ट्रुडो यांना त्‍यागपत्र दण्‍याची मागणी करणारे पत्र लिहिले आहे. मॅकडोनाल्‍ड यांनी पुढील निवडणूक लढवणार नसल्‍याचे सांगितले. याचे कारण स्‍पष्‍ट करतांना ते म्‍हणाले की, लिबरल पक्षाची घसरलेली लोकप्रियता हे त्‍याचे कारण आहे.

नुकत्‍याच झालेल्‍या सर्वेक्षणातही ट्रुडो यांचा लिबरल पक्ष विरोधी कंझर्व्‍हेटिव्‍ह पक्षाच्‍या तुलनेत पिछाडीवर आहे.

संपादकीय भूमिका

ट्रुडो यांच्‍या पक्षातील खासदारांना अंततः त्‍यांच्‍या पक्षाचे आणि देशाचे भविष्‍य चांगले होण्‍यासाठी ट्रुडो यांची हकालपट्टी करणे आवश्‍यक आहे, हे लक्षात आले, हा कॅनडासाठी सुदिनच म्‍हणावा लागेल !