अभिजात (उच्च) भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याप्रकरणी मराठीप्रेमींकडून परशुराम पाटील यांचा सत्कार !

मराठीप्रेमींकडून सत्कार स्वीकारतांना परशुराम पाटील (डावीकडे)

मुंबई – मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याप्रकरणी ‘अभिजात मराठी भाषा समिती’चे सदस्य आणि ‘मराठी भाषा संचालनालया’चे माजी संचालक श्री. परशुराम पाटील यांचा मुंबई येथील नरेवाडी विकास मंडळ अन् धनलक्ष्मी पतसंस्था यांच्या वतीने कांदिवली येथे त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. या वेळी बार कौन्सिलचे सदस्य सुभाष घाडगे, धनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गोविळकर, उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांसह शंकर पवार, बाळकृष्ण कदम, अधिवक्ता दीपक निलवे आदी मराठीप्रेमी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्याविषयीचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवण्यासाठी मराठी भाषातज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या काही बैठकींना उपस्थित राहून श्री. परशुराम पाटील यांनी मार्गदर्शन केले होते.

अभिजात भाषेच्या दर्जामुळे मराठीचे सबळीकरण होईल ! – परशुराम पाटील, माजी संचालक, मराठी भाषा संचालनालय

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठीतील प्राचीन वाङ्मयाचा अन्य भाषेत अनुवाद होईल. मराठी भाषेत संशोधन करणार्‍यांना ‘स्कॉलरशिप’ दिली जाईल. महाराष्ट्रातील विविध बोलीभाषांचा अभ्यास आणि संशोधन होईल. महाराष्ट्रातील १२ सहस्र ग्रंथालयांचे सशक्तीकरण करण्यासाठी अनुदान दिले जाईल. भारतातील ४५० विद्यापिठांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन केले जाईल. व्यवसाय मिळवून देणारी ‘अर्थार्जनाची भाषा’ आणि उच्च शिक्षण देणारी ‘ज्ञानभाषा’ असा मराठीचा विकास होऊ शकेल, असे मनोगत श्री. परशुराम पाटील यांनी सत्कारप्रसंगी व्यक्त केले.

संपादकीय भूमिका

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी आपले आयुष्य वेचण्यार्‍या मराठीजनांचे आभार !