बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी हरियाणातून आणखी एकाला अटक
मुंबई – माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी दारूचा अड्डा चालवणारा अमित हिसामसिंह कुमार (वय २९ वर्षे) याला २३ ऑक्टोबरला गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणातील ११ वी अटक आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अमित कुमार हा हरियाणातील कैठाल तालुक्यातील नाथवान पट्टी येथील रहिवासी आहे.
सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचणारा महंमद झिशान अख्तरच्या सांगण्यावरून अमितने गुरमैलला कटात सहभागी होण्यास सांगितले. त्याच्यावर पूर्वीचे ४ गुन्हे नोंद आहेत. हत्येच्या कटातील काही रक्कम आरोपीपर्यंत पोचली आहे. आरोपींकडून २ पिस्तुल, ३ मॅगझीन, २८ काडतुसे, ५ भ्रमणभाष, २ आधारकार्ड जप्त करण्यात आली होती. झिशान अख्तरची हरियाणातील कैथलमध्ये रहाण्याची व्यवस्था, अन्य सुविधा उपलब्ध करण्याची व्यवस्था केली होती.
झिशानने अमितच्या बँक खात्यावर पैसे मागवून घेतले होते. अमितने त्याच्या बँक खात्यात पैसे आल्यानंतर ८ वेळा पैसे काढून ते झिशानला दिले होते. त्यांतील काही रक्कम त्याने पुण्यात प्रवीण लोणकरपर्यंत पोचवली होती. झिशान अद्याप पकडला गेलेला नाही.