रस्त्यांचा अहवाल सादर न केल्याने उपायुक्तांसह साहाय्यक आयुक्तांना ‘कारणे दाखवा नोटीस’ !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – शहरातील बरेचसे रस्ते खराब झाले असल्याने जे रस्ते देखभाल दुरुस्ती कालावधीमध्ये आहेत ते रस्ते तातडीने संबंधित ठेकेदाराच्या वतीने दुरुस्त करून घेण्याचे आदेश प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी वेळोवेळी दिले होते. या कामामध्ये ठेकेदाराकडून अथवा अभियंत्याकडून कोणताही हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचनाही प्रशासकांनी दिल्या होत्या. यावर कोणतीच कृती झाली नाही, तसेच शहरातील रस्त्याविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था पहाता वेळोवेळी सूचना देऊनही रस्त्यांविषयी कोणताही अहवाल आयुक्त कार्यालयात प्राप्त न झाल्याने प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी उपायुक्त पंडित पाटील, साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदीपक सरनोबत, साहाय्यक आयुक्त नेहा आकोडे, संजय सरनाईक यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावल्या आहेत.