स्नायूंचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी काय करावे ?

निरोगी जीवनासाठी व्यायाम – भाग २१

‘स्नायूंची क्षमता वाढवण्यासाठी आपल्या व्यायामात ‘स्नायूंची शक्ती, लवचिकता आणि चिवटपणा’, हे तीनही घटक सुधारतील, अशा व्यायाम प्रकारांचा समावेश करणे आवश्यक असते.

१. स्नायूंची शक्ती वाढवणे

यासाठी ज्या व्यायामांमध्ये बळ वापरावे लागते, असे व्यायाम करावेत. जड वस्तू उचलण्यासाठी स्नायू निरोगी असणे आवश्यक असते. यासाठी वजन उचलणे, दंड-बैठका, सेतूबंधासन, शलभासन, प्लँक यांसारख्या शरिराचे वजन पेलण्याच्या व्यायामांचा समावेश करावा. या व्यायामांमध्ये वजनाचे प्रमाण वाढवत नेऊन एक ठराविक पुनरावृत्ती करावी, उदा. ५ किलो वजन ३० वेळा उचलणे, काही दिवसांनी ७ किलो वजन ३० वेळा उचलणे.

सौ. अक्षता रेडकर

२. स्नायूंची लवचिकता सुधारणे

यासाठी सांध्यांची हालचाल सुधरवणार्‍या ‘स्ट्रेचिंग’, योगासने, उदा. पश्चिमोत्तानासन, अधोमुखश्वानासन, गोमुखासन इत्यादी व्यायाम प्रकारांचा समावेश करावा.

३. स्नायूंचा चिवटपणा (stamina) वाढवणे

हलक्या वजनासह अधिक पुनरावृत्तीचे व्यायाम केल्याने स्नायूंवर अधिक ताण न पडता स्नायूंमध्ये सहनशक्ती निर्माण होते, उदा. मध्यम ते जलद गतीने १५ मिनिटे धावणे, काही दिवसांनी त्याच गतीने ३० मिनिटे धावणे, सूर्यनमस्कारांची संख्या वाढवत नेणे.’

– सौ. अक्षता रूपेश रेडकर, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (३०.९.२०२४)

निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise