नेमळे (सिंधुदुर्ग) येथील ‘आराध्य’ हॉटेलच्या कर्मचार्‍यांना हिंदु जनजागृती समितीने दिले प्रथमोपचार प्रशिक्षण !

कुडाळ (सिंधुदुर्ग) – कुडाळ तालुक्यातील नेमळे येथील ‘आराध्य’ हॉटेलच्या कर्मचार्‍यांसाठी १६ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार शिबिर घेण्यात आले. हॉटेलचे मालक श्री. उदय पाराळे, तसेच व्यवस्थापक श्री. अमित सावंत यांच्यासह एकूण २२ कर्मचारी यात सहभागी झाले होते. शिबिराचे उद्घाटन श्री. अमित सावंत यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या वेळी समितीच्या कार्याची ओळख सौ. श्यामल करंगुटकर यांनी करून दिली. ‘प्रथमोपचाराचे जीवनातील महत्त्व, बेशुद्ध पडणे, हृदयक्रिया बंद पडलेल्या रुग्णावर उपचार करणे; एखादी वस्तू श्वसनमार्गात अडकून व्यक्ती गुदमरली, तर कोणते प्रथमोपचार करावेत ?’, यांविषयी सौ. अनुश्री गावस्कर यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. या वेळी सौ. शिल्पा सोन्सुरकर आणि सौ. श्यामल करंगुटकर यांनी उपस्थित कर्मचार्‍यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली. या वेळी कर्मचार्‍यांनी प्रथमोपचाराचे पुढील प्रशिक्षण घेण्याविषयी उत्सुकता दर्शवली.

क्षणचित्रे

१. ‘एखाद्याला चक्कर आल्यावर योग्य काय करायचे, हे लक्षात आले. पूर्वी आम्ही चक्कर आलेल्या व्यक्तीच्या तोंडावर पाणी मारत होतो आणि पाणी प्यायला देत होतो, हे चुकीचे आहे, हे शिबिरातून लक्षात आले’, असे उपस्थित कर्मचार्‍यांनी सांगितले.

२. या शिबिरामुळे हॉटेलचे मालक श्री. उदय पाराळे प्रभावित झाले. या वेळी त्यांनी ‘मासातून एकदा कर्मचार्‍यांना प्रथमोपचार प्रशिक्षण द्या’, असे सांगितले. या प्रसंगी त्यांनी कर्मचार्‍यांसाठी प्रथमोपचारविषयक ग्रंथांचा संच खरेदी केला, तसेच ‘प्रथमोपचारविषयक प्रात्यक्षिकांची ‘लॅमिनेटेड’ छायाचित्रे हॉटेलच्या भिंतींवर लावा. त्याचा लाभ सर्वांना होईल’, असे श्री. पाराळे यांनी सांगितले.