माणसाला आचार आणि विचार यांच्या माध्यमातून गगनासारख्या उंचीवर नेणारे वंदनीय संत हेच खरे अंतराळवीर ! 

श्री. दत्तात्रय पटवर्धन

‘अमेरिका, रशिया आणि भारत हे देश विज्ञानाच्या माध्यमातून विशिष्ट यान सिद्ध करून त्याद्वारे काही प्रशिक्षित व्यक्तींना चंद्र किंवा मंगळ या ग्रहांवर पाठवत असतात. त्यांना ‘अंतराळवीर’, असे म्हटले जाते. धाडस आणि अंतराळ संशोधन यांसाठी मी त्यांचे अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देतो.

भारतभूमीवर शेकडो वर्षांपूर्वी होऊन गेलेले संत निवृत्तीनाथ, संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, समर्थ रामदासस्वामी इत्यादी संत हे मला अंतराळवीरच वाटतात; कारण या सर्वांचे हृदय, अंतःकरण आणि मन हे गगनासारखे व्यापक, विशाल अन् सर्वोच्च विचारसरणीचे होते.

आपण संतश्रेष्ठ ज्ञानदेवांचे पसायदान वाचले किंवा संतांच्या शिकवणुकीतील एक महत्त्वाचे सार ‘परमेश्वराचे विस्मरण हेच खरे मरण आहे’, हे लक्षात घेतले, तर संतांचे श्रेष्ठत्व आपल्या लक्षात येते. आताचे मोठमोठे पंडित, पदवीधर आणि शिक्षण तज्ञ यांना लाज वाटावी, इतके या संतश्रेष्ठांचे जीवन अंतर्बाह्य विशुद्ध अन् गगनासारखे उत्तुंग आहे. हे सर्व संत स्वतः नराचे ‘नरोत्तम’ आणि पुढे ‘नारायण’ झाले. त्यांच्या वाङ्मयात एवढी शक्ती आहे की, त्यांच्या महानिर्वाणानंतर त्यांचे वाङ्मय वाचून आणि ते प्रत्यक्ष जगून बरीच मंडळी नराची नारायण झाली, उदा. स्वामी स्वरूपानंद, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज इत्यादी.

माणसाला आचार आणि विचार यांच्या माध्यमातून गगनासारख्या उंचीवर नेणारे, प्रसंगी सूर्यासारखे प्रखर अन् चंद्रासारखे शीतल असणारे आणि भारतासाठी; किंबहुना जगासाठीही सर्वार्थांनी ललामभूत (भूषणावह) ठरणारे वंदनीय संत हेच खरे अंतराळवीर आहेत. हेच खरे शिक्षक आणि हेच खरे गुरु आहेत.’

– श्री. दत्तात्रय पटवर्धन (वय ७१ वर्षे), कोलगाव, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (६.९.२०२४)