Maharashtra Naxal-Affected Polling Stations : महाराष्‍ट्रातील १ सहस्र ८३ मतदान केंद्रांवर नक्षलवाद्यांचे सावट !

५ वर्षांत नक्षलवाद्यांकडून ३० जणांची हत्‍या, ३ पोलिसांचाही समावेश

श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई

मुंबई – महाराष्‍ट्रातील गडचिरोली आणि गोंदिया या जिल्‍ह्यांतील तब्‍बल १ सहस्र ८३ मतदान केंद्रांवर नक्षलवाद्यांचे सावट आहे. वर्ष २०२० पासून राज्‍यातील नक्षलग्रस्‍त भागांमध्‍ये नक्षलवाद्यांनी एकूण ५१ आक्रमणे करून ३० जणांची हत्‍या केली. यात ३ पोलिसांचाही समावेश आहे. नक्षलवाद्यांच्‍या आक्रमणात ४४ पोलीस घायाळ झाले. येत्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍याच्‍या गृह विभागाने राज्‍य सरकारला सादर केलेल्‍या गोपनीय अहवालामध्‍ये ही माहिती देण्‍यात आली आहे.

श्री. प्रीतम नाचणकर

गृहविभागाच्‍या या गोपनीय अहवालामध्‍ये येत्‍या विधानसभेच्‍या निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर नक्षलवाद्यांनी केलेल्‍या कारवाईंची माहिती देण्‍यात आली आहे. या अहवालानुसार गडचिरोली जिल्‍ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या मतदारसंघांतील ९७२, तर गोंदिया जिल्‍ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि आमगाव येथील १११ मतदान केंद्रांवर नक्षलवाद्यांचे सावट असल्‍याचे नमूद करण्‍यात आले आहे. वर्ष २०२० पासून राज्‍यातील नक्षलग्रस्‍त भागांत नक्षलवाद्यांनी १२ ठिकाणी जाळपोळ केली आहे.

आचारसंहितेच्‍या काळात नक्षलवाद्यांकडून झाली आक्रमणे !

मागील अनेक वर्षांपासून निवडणुकीच्‍या आचारसंहितेच्‍या काळात नक्षलग्रस्‍त भागांत नक्षलवादी नागरिकांवर आक्रमण करून भय निर्माण करत आहेत. वर्ष २०१९ मध्‍ये लोकसभा निवडणुकीच्‍या आचारसंहितेच्‍या काळात नक्षलवाद्यांनी ४ जणांची हत्‍या केली. यात एका पोलिसाचा समावेश होता. लोकसभा आचारसंहितेच्‍या काळात नक्षलवाद्यांनी ६ ठिकाणी जाळपोळ केली. या आचारसंहितेच्‍या काळात नक्षलवाद्यांच्‍या आक्रमणात १२ जण गंभीर घायाळ झाले होते. वर्ष २०१९ च्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या आचारसंहितेच्‍या काळात नक्षलवाद्यांनी एका व्‍यक्‍तीची हत्‍या केली, तसेच एका ठिकाणी जाळपोळ केली होती. या कालावधीत नक्षलवाद्यांच्‍या आक्रमणात ४ जण गंभीर घायाळ झाले.

पोलिसांची दमदार कारवाई !

५ वर्षांत ८७ नक्षलवाद्यांचा खात्‍मा आणि १३६ जणांना अटक !

नक्षलवाद्यांच्‍या विरोधात पोलिसांनीही दमदार कारवाई केली. वर्ष २०२० पासून पोलिसांनी तब्‍बल ८७ कट्टर नक्षलवाद्यांचा खात्‍मा केला, तसेच १३६ नक्षलवाद्यांना अटक केली. मागील ५ वर्षांत ३१ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्‍करली.

नक्षलवाद्यांच्‍या विरोधातील कारवाई अधिक तीव्र करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

नक्षलवादाच्या विरोधात लढण्यासाठी ‘स्पेशल टास्क फोर्स’ आणि ‘स्पेशल इंटेलिजेंस ब्युरो’ यांची स्‍थापना करणे, तसेच ‘फोर्टिफाइड पोलीस ठाणे’ उभारण्‍याचे काम चालू आहे. मार्च २०२५ पर्यंत ही कामे पूर्ण होतील. यासाठी ६१ कोटी ३५ लाख रुपये व्यय करण्यात आला आहे. नक्षलग्रस्‍त भागांतील नवीन पोलीस ठाण्यांसाठी २५ पोलीस अधिकारी आणि ५०० कर्मचारी नियुक्‍त करण्यात येणार आहेत. नक्षलवाद्यांवर कारवाई करण्‍यासाठी रात्रीच्‍या वेळी ‘हेलिकॉप्‍टर’ उतरवण्‍याची अनुमती राज्‍यशासनाने केंद्रशासनाकडे मागितली आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍यासमवेत झालेल्‍या बैठकीमध्‍ये महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. येत्‍या २ वर्षांमध्‍ये नक्षलवाद्यांच्‍या विरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्‍यात येणार असल्‍याचेही या वेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

नक्षलवाद समूळ नष्‍ट झाल्‍यासच नक्षलवाद्यांचे जनतेवरील सावट दूर होईल, हे लक्षात घेऊन पोलीस आणि सरकार यांनी त्‍याच्‍या उच्‍चाटनासाठी प्रयत्न करावेत !