दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पाळीव कुत्र्याची हत्या करणारा कह्यात ! ; कोंबड्यांच्या विष्ठेमुळे माशा वाढून विद्यार्थी आजारी !
पाळीव कुत्र्याची हत्या करणारा कह्यात !
पुणे – येथे तरुणाने स्वतःच्या पाळीव कुत्र्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकरणी त्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला कह्यात घेण्यात आले आहे. तरुणाने कुत्र्याला फासावर लटकावून त्याला जिवे मारले. याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
कुत्रा पिसाळला असल्याने हे कृत्य केल्याचे त्या तरुणाने सांगितले; पण मृत कुत्र्याचे शवविच्छेदन केल्यावर खरा प्रकार उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले.
संपादकीय भूमिका : अशा विकृतांना कठोर शिक्षाच हवी !
कोंबड्यांच्या विष्ठेमुळे माशा वाढून विद्यार्थी आजारी !
सांगली – येथील चिकुर्डे आणि डोंगरवाडी फाटा येथील कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांच्या विष्ठेमुळे मोठ्या प्रमाणात माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शालेय विद्यार्थी आजारी पडत असल्याने परिसरातील २ शाळांना १५ दिवस सुट्टी देण्यात आली होती. माशांचा त्रास जनावरांनाही होत आहे. या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका : विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणार्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !
खोक्यात बाँब नव्हे, इलेक्ट्रॉनिक्सचे साहित्य
नागपूर – येथील हिंगणा परिसरात चपलांच्या खोक्यात बाँबसदृश वस्तू आढळली. बाँब निकामी करण्याच्या पथकाने खोका मोकळ्या पटांगणात नेला. जर त्याच्यात स्फोटके आढळली, तर ती तिथेच निकामी करण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले होते. प्रत्यक्षात त्यात इयत्ता १० वीतील विद्यार्थ्याचे इलेक्ट्रॉनिक्सचे साहित्य म्हणजे विज्ञान विषयाच्या प्रात्यक्षिकाचे साहित्य होते. त्याच्या वडिलांना याची कल्पना नसल्याने त्यांनी बाँब समजून पोलिसांना कळवले.
संभाजी ब्रिगेड-ठाकरे गट युती तुटली !
मुंबई – संभाजी ब्रिगेडने २६ ऑगस्ट २०२२ या दिवशी शिवसेनेसमवेत (ठाकरे गटासमवेत) हातमिळवणी केली होती. २३ ऑक्टोबर या दिवशी शिवसेनेसमवेतची युती तोडत असल्याचे संभाजी ब्रिगेडने घोषित केले आहे. संभाजी ब्रिगेड स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुलाच्या प्रौढत्वाच्या अर्जावर १८ नोव्हेंबरला सुनावणी !
पोर्शे कार अपघात प्रकरण
पुणे – कल्याणीनगर अपघातातील मुलाला प्रौढ ठरवून त्याविरोधात फौजदारी खटला चालवण्यासाठी पोलिसांनी प्रविष्ट केलेल्या अर्जावरील सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या प्रकरणातील कागदपत्रे बाल न्याय मंडळाकडून मागवली; पण ती मिळाली नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. १८ नोव्हेंबर या दिवशीच पोर्शे कार मिळण्याविषयी आणि मुलाच्या पासपोर्टविषयी प्रविष्ट केलेल्या अर्जावर युक्तीवाद होणार आहे.