अधिवक्ता दत्ता सणस ‘अखिल भारत हिंदु महासभे’चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष !
सातारा – अखिल भारत हिंदु महासभा महाराष्ट्र प्रदेशचे द्विवार्षिक प्रांतिक अधिवेशन जळगाव येथे पार पडले. या अधिवेशनामध्ये सातारा येथील अधिवक्ता दत्ता सणस यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली, अशी माहिती हिंदू महासभेचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. धनराज जगताप यांनी दिली. या वेळी राष्ट्रीय प्रवक्ते श्री. दिनेश भोगले उपस्थित होते. प्रमुख कार्यवाहपदी श्री. महेश सावंत-पटेल, उपाध्यक्षपदी श्री. अनुप केणी, अधिवक्ता गोविंद तिवारी, श्री. प्रमोद घोरपडे, प्रमुख संघटकपदी श्री. रमेश सुषिर, कोषाध्यक्षपदी श्री. हरिश शेलार, राज्य महिला आघाडी प्रमुखपदी श्रीमती तिलोत्तमाताई खानविलकर आणि प्रदेश प्रवक्तेपदी आनंद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.
नवनियुक्तीनंतर अध्यक्षीय भाषणात अधिवक्ता सणस म्हणाले, ‘‘भारतातील सर्व हिंदुत्वनिष्ठ विचारांचे राजकीय पक्ष आणि संघटन यांनी पक्षभेद, मतभेद विसरून हिंदुत्वाच्या रक्षणाच्या लढ्यासाठी एकत्र यावे. आगामी होणार्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कट्टर हिंदुत्वनिष्ठ असणार्या हिंदु महासभेला बहुसंख्य हिंदूंनी सत्तेवर आणावे. हिंदू महासभा हा हिंदूंचे हित जोपासणारा पक्ष आहे. हिंदुत्वाचे राजकारण करणार्या हिंदु महासभेलाच जनतेने निवडून द्यावे.
प्रांतिक अधिवेशनात संमत केलेले ठराव !
- भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यात यावे.
- पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशांतून शरण आलेल्या हिंदूंना भारताचे नागरिकत्व देण्यात यावे.
- बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर होणार्या अत्याचारांवर त्यांना त्वरित संरक्षण देऊन बांगलादेशवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा.