संपादकीय : देशविरोधी शक्तींचा माल-मसाला !
‘उंचे लोग, उंची पसंद’ असे म्हणत समाजाला नशेखोर बनवणार्या पान मसाल्याचे विज्ञापन अभिनेते अनिल कपूर यांनी लाथाडले आणि त्यांचा निर्णय पसंत पडल्याने अनेकांच्या मनातील त्यांचे स्थान उंचावले. पान मसाल्याच्या विज्ञापनासाठी अनिल कपूर यांना १० कोटी रुपये देऊ केले होते; पण त्यांनी ते नाकारून समाजहिताचे भान राखले, ही कृती अभिनंदनीय आहे. कोट्यवधी रुपयांचे मालक असतांनासुद्धा नीतीमत्तेची चाड न बाळगता केवळ आर्थिक लाभापोटी चुकीची विज्ञापने करणार्या वलयांकित व्यक्तींची आपल्याकडे न्यूनता नाही. अभिनेते शाहरूख खान, सलमान खान, सैफ अली खान, अजय देवगण, अक्षयकुमार आदी अभिनेते, तसेच सुनील गावस्कर, कपिल देव यांच्यासारखे खेळाडू केवळ पैशांसाठी अशी समाजविघातक विज्ञापने करतात. असे प्रकार येथे चालू शकतात, याचे कारण ‘एखाद्याचा अभिनय किंवा खेळ चांगला असला, म्हणजे त्याची प्रत्येकच कृती आदर्श आणि योग्य असते, असे नाही’, हे समजून घेण्याएवढी विवेकबुद्धी आजच्या समाजात नाही. गुटखा किंवा पान मसाला व्यक्तीच्या आरोग्याला अतिशय हानीकारक असून त्यांच्या सेवनाने कर्करोगाचा धोका संभवतो. पान मसाला, गुटखा खाणार्या व्यक्ती ठिकठिकाणी थुंकतात. त्यामुळे अस्वच्छता आणि अनारोग्य निर्माण होते; पण त्याची चिंता कोण करतो ? जनतेच्या आरोग्याची काळजी असेल, तर नुसती चेतावणी (डिस्क्लेमर) छापून चालत नाही. नुसते ‘गुटखा आरोग्याला हानीकारक आहे ’, एवढे वाक्य पुडीवर बारीक अक्षरांत कोण वाचतो ? ही केवळ औपचारिकता असते किंवा कायद्याच्या कचाट्यातून स्वतःची सुटका करून घेण्याची केलेली सोय असते.
युवाशक्ती हे भारताचे बलस्थान आहे. ते भारताने ओळखले नसले, तरी शत्रूने चांगलेच ओळखले आहे. त्यामुळेच युवा पिढी उद्ध्वस्त, दिशाहीन, तसेच व्यसनी बनवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न चालू आहेत. आज-काल सर्वत्र दिसणारे ‘जंगली रमी’चे (एकप्रकारच्या ऑनलाईन जुगाराचे) विज्ञापन, हा त्याचाच एक प्रकार आहे. त्यामुळे अशा मोहमायेपासून युवा पिढीला वाचवायचे असेल, तर भगीरथ प्रयत्नांची आवश्यकता आहे. पान मसाल्याच्या रंगात भारताचा मात्र बेरंग होत आहे. युवा पिढी निस्तेज होत आहे. हा दिसायला पान मसाला असला, तरी प्रत्यक्षात तो देशविरोधी शक्तींचा माल-मसाला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. भारतातील गुटखा आणि पान मसाला यांची बाजारपेठ ही अंदाजे ४५ सहस्र कोटी रुपयांची आहे. यातून महसूल तर मिळतो; परंतु जनतेचे आरोग्य मात्र धोक्यात येते. व्यसनापोटी कुटुंबे उद्ध्वस्त होतात, समाजात सर्वत्र अस्वच्छता निर्माण होते. भारतीय रेल्वे गुटख्याचे डाग स्वच्छ करण्यासाठी प्रतिवर्षी तब्बल १२ सहस्र कोटी रुपये व्यय करते. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्वच्छ भारत’साठी धडपडत असतांना आणि त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असतांना हे ‘पिचकारीवाले’ सर्वत्र घाण करतांना दिसत आहेत. त्यामुळे आता सरकारनेच कठोर धोरण अवलंबावे आणि गुटखा अन् पान मसाला यांवर देशव्यापी बंदी आणून ‘नशामुक्त भारता’चा संकल्प साकार करावा.
एकीकडे व्यसनमुक्ती मोहीम राबवणे, तर दुसरीकडे महसुलासाठी पानमसाला, मद्य आदींवर बंदी न घालणे, हा सरकारी यंत्रणांचा दुटप्पीपणाच ! |