संपादकीय : हिंदूंना वाली कोण ?
‘हिंदूंना कुठलाही सण आनंदात साजरा करू द्यायचा नाही, असा चंग इस्लामी कट्टरतावाद्यांनी बांधला आहे’, असे एकामागून एक घडणार्या घटनांवरून दिसून येते. देहलीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात हिंदु विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त आयोजित केलेला दीपोत्सव इस्लामी कट्टरतावादी विद्यार्थ्यांनी उधळून लावला. या वेळी त्यांनी ‘अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे) आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. नुकत्याच झालेल्या नवरात्रोत्सवात देशात विविध ठिकाणी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकींवर इस्लामी कट्टरतावाद्यांनी आक्रमण केल्याच्या घटना आपण पाहिल्या. त्याच्याच काही दिवसांआधी महाराष्ट्रात गणेशोत्सवात विविध ठिकाणच्या श्री गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकींवर इस्लामी कट्टरतावाद्यांनी एकाच वेळी आक्रमण केल्याच्या घटनाही जनतेच्या विस्मृतीत गेल्या नसतील. ही सुनियोजित आणि संघटित आक्रमणे पहाता, ‘हिंदूंना वाली कोण ?’, असा प्रश्न पडतो.
एवढे होऊनही पोलीस आणि प्रशासन मात्र थंड आहेत. ते हे प्रकार रोखण्याऐवजी इस्लामी कट्टरतावाद्यांसह मार खाणार्या हिंदूंनाही अटक करून ‘समतोल’ साधतांना दिसतात. ‘विद्यापिठांमध्ये देश आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात कृत्ये होण्याच्या घटना आता नवीन राहिल्या नाहीत’, हे सत्य असले, तरी हे वाढते प्रकार देशाच्या अखंडतेला उघड आव्हान देत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. काही वर्षांपूर्वी देहलीतील वादग्रस्त जवाहरलाल नेहरू विद्यापिठात काही राष्ट्रघातकी विद्यार्थ्यांनी ‘भारत तेरे तुकडे होंगे’, ‘तुम कितने अफझल मारोगे, घर घर से अफझल निकलेगा’, अशा चिथावणीखोर घोषणा दिल्या. त्या वेळी कुणावरही म्हणावी अशी ठोस कारवाई न झाल्यानेच तेथे अजूनही ही विषारी विचारसरणी निपजत आहे. याच विद्यापिठात साम्यवाद्यांनी योगगुरु रामदेवबाबा यांना प्रवेश करू दिला नव्हता. अलीगड मुस्लिम विद्यापीठ काय किंवा जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ काय, तेथेही अशा स्वरूपाच्या घटना सर्रास घडत असतात. अन्य कुठल्या देशात अशी विद्यापिठे असती, तर त्यांना केव्हाच टाळे ठोकले गेले असते. आपल्याकडे उलट चित्र आहे. अशा सर्व विद्यापिठांना सरकार भरघोस अनुदान देते ! म्हणजे सरकारकडून पैसे घेऊन ते अप्रत्यक्षपणे देशाविरुद्ध आणि हिंदु धर्माविरुद्ध वापरण्याचे उपद्व्याप या विद्यापिठांत चालतात. शत्रूला त्याच्या कारवाया करायला अशी विद्यापिठे उत्तम माध्यम असतात. त्यामुळे अशा विद्यापिठांना पोसणे, म्हणजे एक प्रकारे आत्मघातच नव्हे का ? जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठातील दीपोत्सवात काही मुसलमान विद्यार्थिनींच्या सहभागावर अप्रत्यक्षपणे आक्षेप घेण्यात आला. याविषयी सर्वधर्मसमभाववाले गप्प का ? तसेच सर्वधर्मसमभाव म्हणून मंदिरांत इफ्तार पार्ट्या आयोजित करणारे आता याविषयी काही बोलत का नाहीत ? हिंदूंच्या सणांमध्ये बाधा आणण्याच्या कृत्यांचा बोलविता धनी कोण आहे ?, हे सरकारने शोधून काढले पाहिजे. सरकारने शिक्षण सुधारण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण लागू केले असले, तरी अशा सुधारणा करण्याच्या पलीकडे गेलेल्या विद्यािपठांचे काय ?, हा प्रश्न उतरतोच ! याचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे त्यांना टाळे ठोकणे. यातच देशहित आहे.