इतरांचे कौतुक करून त्यांना प्रेरणा आणि आनंद देणारे पू. संदीप आळशी !
‘श्री गुरुकृपेमुळेच मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील अन्नपूर्णा कक्षामध्ये संतांसाठीचा स्वयंपाक बनवण्याची सेवा मिळाली आहे. तेथे सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांच्यासाठीसुद्धा स्वयंपाक बनवला जातो. पू. दादांच्या सहवासात मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. इतरांना आनंद देणे
पू. दादा नेहमी स्वयंपाकाचे कौतुक करून आम्हाला प्रेरणा देतात. तेव्हा ‘इतरांचे गुण बघून त्यांचे कौतुक केल्याने प्रेमभाव वाढतो’, हे मला शिकायला मिळाले. पू. दादांचे स्मितहास्य पाहून ‘आपणही आपल्या हास्यातून इतरांना आनंद द्यायला हवा’, असे वाटते.
२. ‘स्वतःमध्ये पू. दादांप्रमाणे स्थिरता यायला हवी’, असे वाटणे
पू. दादा नेहमीच स्थिर असतात. कधीही त्यांच्या स्थितीत पालट होत नाही. त्यांना पाहिल्यावर माझी सेवा परिपूर्ण होण्यासाठी माझ्यातही अशीच स्थिरता यायला हवी’, हे माझ्या लक्षात आले.
३. कर्तेपणा इतरांना देणे
एकदा पू. दादा आम्हा सर्व साधकांना म्हणाले, ‘‘तुम्ही माझी काळजी घेता; म्हणून हे ग्रंथांचे कार्य चालू आहे.’’ तेव्हा ‘सर्व कर्तेपणा देवाला आणि इतरांना देण्यासाठी मन किती उदार असायला हवे’, हे मला शिकायला मिळाले.
४. सेवा ताणविरहीत आणि आनंदाने करावी !
एकदा पू. दादा म्हणाले, ‘‘सेवा कधी छोटी किंवा मोठी नसते. सेवा ताणविरहीत आणि आनंदाने केली की, ती परिपूर्ण होते. मीसुद्धा असेच करतो. तुम्हीही असे करून पहा !’’
‘हे गुरुमाऊली, माझ्यासारख्या जिवाला आपण आपल्या चरणांजवळ ठेवले आणि ही सेवेची संधी दिली, यासाठी आपल्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. आशा होनमोरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१२.२०२३)