साधकाचे ध्येय सिद्धीप्राप्ती हे नसून मुक्तीप्राप्ती असावे ! – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
।। ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ।।
व्यासपिठावरील मान्यवर आणि भक्तजनांना नमस्कार !
‘आपण भविष्यात घडणार्या घटना काही वर्षांआधी सिद्धीद्वारे जाणून घेऊ शकतो’, याची प्रचीती घेतली. मी जी उग्र साधना केली, ती सिद्धी प्राप्तीसाठी केली नाही. साधना करतांना मला त्या सिद्धींची प्राप्ती होत गेली.
१. सिद्धी
सिद्धी म्हणजे आध्यात्मिक मार्गाच्या प्रगतीमधील परमेश्वराने दिलेली प्रलोभने आहेत. त्यांचा उपयोग आवश्यक असेल, तेव्हा लोककल्याणासाठीच केला, त्या सिद्धींमध्ये गुंतून न रहाता आध्यात्मिक वाटचाल तशीच नेटाने चालू ठेवली, तर अंती आत्म्याचा उद्धार होऊन आत्मा परमात्म्यात विलीन होणे शक्य होते. साधकाचे ध्येय सिद्धीप्राप्ती हे नसून मुक्तीप्राप्ती हे असावे ! सर्व भार परमात्म्यावर टाकून साधनेत विलीन व्हावे.
२. आध्यात्मिक उन्नतीची इच्छा असणार्या साधकांनी सर्व भार परमेश्वरावर टाकून साधनेमध्ये लीन व्हावे !
आपण स्वतःच आपल्या सांसारिक समस्यांची विवंचना केली, तर परमेश्वर म्हणतो, ‘हा स्वतःच समर्थ आहे, तर मी याच्याकडे का लक्ष द्यावे ?’ साधक सर्व भार परमेश्वरावर टाकून साधनेमध्ये लीन झाला आणि त्याला त्याच्या समस्यांचे विस्मरण झाले, तर परमेश्वर म्हणतो, ‘अरे, हा माझ्यातच विलीन झाला आहे. आता याची चिंता मलाच केली पाहिजे !’ आध्यात्मिक उन्नती इच्छित असणार्या साधकांनी हीच वृत्ती अंगी बाणवली, तर त्यांचा उद्धार होणे कठीण नाही.
३. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी बहुसंख्य साधकांना केलेली विनंती !
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी ज्यांचा गुणगौरव सत्कार करू शकलो, त्याबद्दल मला समाधान प्राप्त झाले; मात्र काही विशेष कारणास्तव बहुसंख्य साधक, हितचिंतक आणि संस्था यांचा सत्कार करू शकलो नाही, याबद्दल मी दिलगीर आहे. म्हणून आता सदरहू सत्कार ज्यांच्या त्यांच्या घरीदारी किंवा पर्यायी मार्गे करणार आहे, तो त्यांनी स्वीकारावा, ही विनंती !
४. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी साधनेसाठी केलेले मार्गदर्शन !
आता मी सर्वांचा हितचिंतक असल्यामुळे सांगू इच्छितो, ‘‘आपणा सर्वांवर श्री दत्तगुरूंनी स्थिर कृपादृष्टी ठेवावी. त्याकरता आपण योग्य ती साधना अखंड करा, म्हणजे अनाहत चक्रातील नको ती शक्ती निघून जाईल आणि नामासहित पुण्याई फळाला येईल ! हे केवळ माझ्या अनुभवाने सांगत आहे. तथापि ज्यांची ज्या देवतांवर श्रद्धा असेल, त्यांचेवर हा भार टाकावा. दिखाऊ मूर्तीपूजा अंतर्भूत नसावी.’’
शुभं !’
– (साभार : ‘भक्तिसंगम’, दिवाळी विशेषांक नोव्हेंबर २०१६)