Lahore Most Polluted : लाहोर जगातील सर्वांत प्रदूषित शहर !
लाहोर (पाकिस्तान) – पाकिस्तानातील लाहोर शहर हे जगातील सर्वांत प्रदूषित शहर घोषित करण्यात आले आहे. लाहोर शहराचा ‘हवेचा दर्जा निर्देशांक’ ४०० (सध्या ३९४) च्या जवळ आहे. पाकिस्तानच्या पंजाब सरकारने धूर मिश्रित धुक्यांचा परिणाम अल्प करण्यासाठी कृत्रिम पावसाची योजना आखली आहे, असे पंजाबच्या माहितीमंत्री अजमा बोखारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पंजाब सरकारने ‘अँटी स्मॉग स्क्वाड’ चालू केले आहे. धूर आणि धुके यांच्या मिश्रणामुळे जे प्रदूषित धुके निर्माण होतात, त्यावर नियंत्रण मिळवण्याचे काम ‘अँटी स्मॉग स्क्वाड’ नावाचे पथक करते. हे पथक शेतकर्यांना पिकांचे अवशेष जाळण्याच्या धोक्यांविषयी शिक्षित करेल.
मरियम नवाज भारताकडे साहाय्य मागणार !
पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी नुकतेच प्रांतातील धुक्याचा प्रभाव अल्प करण्यासाठी भारतासोबत चर्चा करण्याचे आवाहन केले होते. त्या म्हणाल्या की, धुक्याचा सामना करण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. भारतामध्येही अशाच प्रकारची समस्या उद़्भवते. हे सूत्र भारतासमोर तातडीने मांडले पाहिजे.
हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे काय ?
हवा गुणवत्ता निर्देशांक हा हवेतील अनेक प्रदूषकांच्या एकाग्रतेचे मोजमाप आहे. १०० पेक्षा अधिक हवा गुणवत्ता निर्देशांक आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो आणि १५० पेक्षा अधिक हवा गुणवत्ता निर्देशांक आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो.