India China Border Dispute : भारत आणि चीन यांच्‍यामध्‍ये विश्‍वास निर्माण होण्‍यास वेळ लागेल !

भारताचे सैन्‍यदलप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांची स्‍पष्‍टोक्‍ती

भारताचे सैन्‍यदलप्रमुख उपेंद्र द्विवेदी

नवी देहली – भारत आणि चीन यांच्‍यात प्रत्‍यक्ष नियंत्रणरेषेवर पुन्‍हा गस्‍त घालण्‍याच्‍या संदर्भात करार झाला आहे, अशी दोन्‍ही देशांनी अधिकृतरित्‍या माहिती दिली असतांना यावर भारताचे सैन्‍यदलप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्‍हणाले की, हा करार चांगला आहे; मात्र सर्वांत आधी दोन्‍ही देशांना पुन्‍हा विश्‍वास निर्माण करावा लागेल. त्‍यासाठी सैनिकांनी एकमेकांना पहाणे आणि बोलणे आवश्‍यक आहे. यासाठी गस्‍त घालण्‍यासाठी योग्‍य वातावरण उपलब्‍ध करून दिले जाईल. आम्‍ही पुन्‍हा विश्‍वास संपादन करण्‍याच्‍या प्रक्रियेत असून त्‍यासाठी वेळ लागेल, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

जनरल द्विवेदी पुढे म्‍हणाले की, दोन्‍ही देशांमध्‍ये विश्‍वास निर्माण होण्‍यासाठी सैन्‍य मागे घेणे आणि ‘बफर झोन’ (सीमांमधील निर्मनुष्‍य जागा) व्‍यवस्‍थान करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपण जेव्‍हा एकमेकांचे ऐकू आणि एकमेकांना समाधानी अन् संतुष्‍ट करू, तेव्‍हाच विश्‍वास निर्माण करता येईल. सिद्ध झालेल्‍या बफर झोनमध्‍ये आम्‍ही जाऊ, असा विश्‍वास व्‍यक्‍त करू शकू. पेट्रोलिंगमुळे ही प्रक्रिया करणे सोपे जाईल. दोन्‍ही बाजूंना एकमेकांचे मन वळवण्‍याची संधी मिळेल. एकदा विश्‍वास प्रस्‍थापित झाला की, पुढील पाऊल उचलले जाईल.


काय होते प्रकरण

एप्रिल २०२० मध्‍ये चीनने पूर्व लडाखच्‍या ६ भागांत अतिक्रमण केले होते. वर्ष २०२२ पर्यंत चिनी सैन्‍याने ४ भागांतून माघार घेतली. यानंतर येथे गलवान खोर्‍यामध्‍ये भारत आणि चीन सैन्‍यात युद्ध झाले होते. त्‍यात भारताचे २० सैनिक वीरगतीला प्राप्‍त झाले होते, तर चीनचे ४० हून अधिक सैनिक ठार झाले होते. तेव्‍हापासून भारतीय सैन्‍याला दौलत बेग ओल्‍डी आणि डेमचोक या भागांमध्‍ये गस्‍त घालण्‍याची अनुमती नव्‍हती.

संपादकीय भूमिका

भारत आणि चीन यांच्‍यात विश्‍वास कधीही निर्माण होऊ शकत नाही; कारण टाळी एका हाताने वाजत नाही. चीनची मानसिकता, त्‍याचा इतिहास पहाता, हेच सत्‍य आहे. त्‍यामुळे भारताने नेहमीच सतर्क राहूनच चीनशी वागले पाहिजे !