BJP Slams Udhayanidhi Stalin : ‘स्टॅलिन’ हे नाव तरी तमिळ आहे का ?

स्टॅलिन यांनी तमिळी लोकांना मुलांची नावे तमिळ भाषेत ठेवण्याविषयी केलेल्या आवाहनाचे प्रकरण

तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन व भाजपचे केंद्रीय मंत्री एल्. मुरुगन

चेन्नई (तमिळनाडू) – उदयनिधी स्टॅलिन हे नाव तरी तमिळ आहे का ? स्टॅलिन यांनी अगोदर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची तमिळ नावे ठेवावीत आणि मग बोलावे, अशी टीका भाजपचे केंद्रीय मंत्री एल्. मुरुगन यांनी केली. तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केंद्र सरकार तमिळी लोकांवर हिंदी लादत असल्याचा आरोप करत ‘तमिळनाडूतील नवदांपत्यांनी त्यांच्या मुलांची नावे तमिळ भाषेत ठेवावीत’, असा सल्ला दिला. त्यावर मुरुगन यांनी वरील भाष्य केले. ते म्हणाले की, तमिळनाडूवर कुणीही हिंदीची सक्ती करत नाही आणि ज्यांना हिंदी शिकायचे आहे, त्यांना कोणत्याही आडकाठीखेरीज हिंदी शिकता आले पाहिजे.

मुरुगन पुढे म्हणाले की, द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम्, म्हणजेच द्रविड प्रगती संघ) पक्ष सामाजिक न्यायाची भाषा वापरतो. प्रत्यक्षात मात्र त्याच्या एकदम विरोधात वागतो. खरेतर पंतप्रधान मोदी हे तमिळला जगभरात पोचवण्याचे काम करत आहेत; परंतु मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन मात्र जनतेची दिशाभूल करत आहेत.

काय आहे प्रकरण ?

एका जाहीर सभेत उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते की, तमिळनाडूवर हिंदी भाषा लादली जात आहे. दूरदर्शन केंद्रावर प्रसारित झालेल्या एका कार्यक्रमात ‘द्रविडम्’ शब्दाला वगळण्यात आले. द्रमुकचे कार्यकर्ते आणि तमिळप्रेमी असेपर्यंत ‘द्रविडम्’ शब्द तमिळ भाषेतून काढला जाणार नाही. हिंदीचे अतिक्रमण तामिळनाडू कधीच स्वीकारणार नाही. त्यामुळे पालकांनी त्यांच्या मुलांची नावे तमिळ भाषेत ठेवली पाहिजेत.