Bangladesh Protest Against President : शेख हसीना यांनी त्यागपत्र दिल्याचा पुरावा नसल्याच्या राष्ट्रपतींच्या विधानाने वाद
|
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात ऑगस्ट मासामध्ये तथाकथित विद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. आता अडीच महिन्यानंतर बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांच्या विरोधात आंदोलन चालू झाले असून त्यांच्या त्यागपत्राची मागणी केली जात आहे. २२ ऑक्टोबरच्या रात्री आंदोलक राष्ट्रपतींचे निवासस्थान वंगभवन येथे पोचले आहेत. त्यांना सैन्याने वाटेत रोखले. आंदोलकांचा जमाव हिंसक झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. येथे चेंगराचेंगरीत किमान ५ जण घायाळ झाले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आंदोलकांनी दगडफेक चालू केल्याने त्यांनी कडक कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. या आंदोलकांनी ५ मागण्या केल्या आहेत. २ दिवसांपूर्वी राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचे त्यागपत्र दिल्याचे मी नुकतेच ऐकले; परंतु त्यांच्या त्यागपत्राशी संबंधित कोणतेही पुरावे माझ्याकडे नाहीत. त्यांचे त्यागपत्र घेण्यासाठी मी अनेक वेळा प्रयत्न केले होते; पण कदाचित् त्यांच्याकडे त्यासाठी वेळ नव्हता.
Controversy erupts in Bangladesh as the President’s statement does not give any proof of the fact that Sheikh Hasina has submitted her resignation
Protests start erupting against the President of Bangladesh
The protest demands that the President be removed within 2 days !… pic.twitter.com/EFACFumJCX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 23, 2024
या विधानामुळे विरोधी पक्ष आणि संघटना भडकल्या आणि त्यांनी राष्ट्रपती शहाबुद्दीन यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन चालू केले. ‘राष्ट्रपतींनी पदावर रहाण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यांनी २ दिवसांत पद सोडावे’, अशी मागणी केली आहे.
आज होणार नव्या राष्ट्रपतींची निवड !
राष्ट्रपती शहाबुद्दीन यांच्या वक्तव्याचा वाढता विरोध पहाता आंदोलनाशी संबंधित २ नेते हसनत अब्दुल्ला आणि सरजीस आलम रात्री आंदोलकांपर्यंत पोचले. त्यांनी लोकांना तेथून निघून जाण्याचे आवाहन केले. ‘२ दिवसांत देशात मोठे सत्तापरिवर्तन होईल’, असे आश्वासन विद्यार्थी नेत्यांनी जनतेला दिले. ‘सैन्यदलप्रमुखांच्या उपस्थितीत राजकीय पक्षांशी बोलून २४ ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रपती नियुक्त होऊ शकेल, अशी कुणाची तरी निवड करू’, असे विद्यार्थी नेते हसनत यांनी सांगितले. ‘२४ ऑक्टोबरपर्यंत नवा राष्ट्रपती निवडला नाही, तर जनतेसमवेत रस्त्यावर उतरू’, असे ते म्हणाले.
आंदोलकांनी वर्ष १९७२ मध्ये लिहिण्यात आलेली देशाची राज्यघटना पालटून नवी राज्यघटना लिहिली जावी, असा आग्रह धरला आहे. तसेच शेख हसीना यांच्या अवामी लिग पक्षाच्या ‘बांगलादेश छात्र लीग’ या विद्यार्थी संघटनेवर बंदी आणावी, शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली वर्ष २०१४, २०१८ आणि २०२४ मध्ये झालेल्या निवडणुका अवैध असून या निवडणुकांतून निवडून आलेल्या खासदारांना तात्काळ अपात्र ठरवण्यात यावे, अशा मागण्या केल्या आहेत.
शेख हसीना यांनी देश सोडून भारतात आश्रय घेतल्यानंतर बांगलादेशात निवडणूक होईपर्यंत अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. याचे नेतृत्व प्रा. महंमद युनूस करत आहेत.
शेख हसीना अजूनही बांगलादेशाच्या पंतप्रधान आहेत कि नाही ?
राष्ट्रपतींच्या विधानानंतर बांगलादेशात घटनात्मकदृष्ट्या शेख हसीना अजूनही पंतप्रधान आहेत कि नाही, अशी चर्चा चालू झाली आहे. शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात गेल्यावर काही दिवसांनी त्यांचा मुलगा वाजिद जॉय यांनी दावा केला होता की, शेख हसीना अजूनही बांगलादेशाच्या खर्या पंतप्रधान आहेत.
बांगलादेशाच्या राज्यघटनेच्या कलम ५७ (अ) नुसार पंतप्रधानांनी कधीही राष्ट्रपतींकडे त्यागपत्र दिल्यास देशातील पंतप्रधान पद रिक्त होईल. आता बांगलादेशात या संदर्भात समस्या निर्माण झाली आहे. शेख हसीना यांचे त्यागपत्र त्यांच्याकडे नसल्याचे राष्ट्रपती सांगत आहेत.
बांगलादेशात कायदामंत्री पदावर कार्यरत असिफ नजरुल यांनी राष्ट्रपतींच्या वक्तव्याचा निषेध केला. ते म्हणाले की, राष्ट्रपती स्पष्टपणे खोटे बोलत आहेत. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले, तर सरकारने त्यांना पदावर ठेवण्याचा विचार करावा.