गोव्यात ‘नरकासुर धमाका’ नावाने बियरची पारितोषिके ठेवणार्‍या लॉटरी कुपनांना विरोध !

‘गोमंतक टीव्ही’च्या आवाहनानंतर आणि गोवा युवा शक्तीच्या प्रत्यक्ष कृतीनंतर ‘आई नवदुर्गा चोडण’ने तिचे लॉटरी कुपन मागे घेतले !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

पणजी – ‘आई नवदुर्गा चोडण’ संघटनेच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने ‘नरकासुर धमाका’ या मथळ्याखाली लॉटरी कुपनांची विक्री ठेवण्यात आली होती. यामध्ये ‘किंगफिशर बियर’ पारितोषिक म्हणून मिळणार होते. पहिले पारितोषिक लहान बियरचे १५ खोके आणि ४ सहस्र रुपये, दुसरे पारितोषिक लहान बियरचे १० खोके आणि ३ सहस्र रुपये, तिसरे लहान बियरचे ५ खोके आणि २ सहस्र रुपये, चौथे लहान बियरचे ४ बॉक्स आणि दीड सहस्र रुपये अन् पाचवे पारितोषिक किंगफिशर लहान बियरचे ३ खोके आणि १ सहस्र रुपये, अशी पारितोषिके ठेवण्यात आली होती. त्याखेरीज ५ उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये प्रत्येकाला  लहान बियरचे २ खोके आणि ५०० रुपये रोख रक्कम मिळणार होती.

या लॉटरीचा निकाल २९ ऑक्टोबरला घोषित होणार होता. याविषयी ‘गोमंतक टीव्ही’वर ही बातमी प्रसारित झाल्यानंतर अनेकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे संघटनेने ही लॉटरी कुपने मागे घेतली आहेत. गोवा युवा शक्तीच्या काही युवकांनी त्यांना संपर्क केला, त्यांचे प्रबोधन केले आणि लॉटरी रहित करायला लावली. लॉटरी काढणार्‍यांनी क्षमाही मागितली. ‘गोमंतक टीव्ही’ने लॉटरीची पोस्ट प्रसारित करतांना ‘तुम्हाला काय वाटते ? व्यक्त व्हा बिनधास्त !’, असे विचारून ‘आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा’, असे आवाहन केले होते. तिस्क-उसगाव येथील एका संघटनेने काढलेले अशाचे प्रकारचे लॉटरी कुपन रहित केले आहे.

बियरच्या पारितोषिकाची आणखी एक पोस्ट प्रसारित !

बियरच्या पारितोषिकाची आणखी एक पोस्ट सध्या माशेल येथून सामाजिक माध्यमात प्रसारित झाली आहे.यातही किंगफिशर बियरचेच पारितोषिक ठेवण्यात आले आहे. सुजाण गोमंतकियांनीही याचीही नोंद घ्यावी आणि हे प्रकार रोखण्यासाठी योगदान द्यावे. ही पोस्ट जनतेच्या माहितीसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत. त्यात संपर्क क्रमांक दिलेले आहेत.

संपादकीय भूमिका 

गोमंतक टीव्ही आणि गोवा युवा शक्ती ही संघटना यांचे अभिनंदन !