परप्रांतातील मासेमारी नौकांची घुसखोरी थांबवण्यासाठी ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा वापर करा ! – रविकिरण तोरसकर, जिल्हा संयोजक, भाजप मच्छिमार सेल

मालवण – महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रामध्ये परराज्यातील अतीजलद मासेमारी नौकांचे (हायस्पीड ट्रॉलर्सचे) अतिक्रमण वाढत आहे. यामुळे स्थानिक मासेमारांची हानी होत आहे, तसेच मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांवर आक्रमण केले जात आहे. मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेद्वारे परराज्यातील अतीजलद नौकांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नसल्याने त्यांची घुसखोरी थांबवण्यासाठी ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा तात्काळ वापर चालू करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे मच्छिमार सेलचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी मत्स्य व्यवसाय विभागाच्या मुख्य सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भाजपचे मच्छिमार सेलचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर

परप्रांतियांच्या अतीजलद मासेमारी नौकांमुळे स्थानिक मासेमारांच्या मासे पकडण्याच्या साहित्याची हानी होत आहे. परप्रांतीय मासेमार येथील अधिकार्‍यांवरही आक्रमण करण्यास धजावू पहात आहेत. मत्स्य विभागाकडे सद्य:स्थितीत असलेल्या गस्तीनौकेद्वारे यांवर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे.

मालवण येथे वर्ष २०१४ मध्ये ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयी प्रशिक्षण देण्यात आले होते. याविषयी शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर गेली १० वर्षे पाठपुरावा चालू होता. त्यानंतर ड्रोन तंत्रज्ञानाचा सागरी गस्तीसाठी वापर करण्याचा निर्णय घेऊन सरकारने जुलै २०२४ मध्ये निविदा घोषित केली. ही निविदा उघडण्याचा २७ जुलै हा दिनांक होता; परंतु आज ३ महिने होऊनही ‘ड्रोन’ यंत्रणा किनारपट्टीवरील कोणत्याही जिल्ह्यात कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे परप्रांतीय अतीजलद मासेमारी नौकांची झुंडशाही आजही चालू आहे. हे थांबवण्यासाठी तात्काळ ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी मागणी रविकिरण तोरसकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.