४ मंदिरांतील चोर्यांचा छडा लागला : १२ लाख ८५ सहस्र रुपयांचे साहित्य कह्यात
फोंडा, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – फोंडा येथील चोरीच्या घटनांचे अन्वेषण करतांना पोलिसांना राज्यातील ४ मंदिरांतील चोर्यांचा छडा लागला आहे. या संदर्भातील माहिती दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. अधीक्षक सुनीता सावंत यांनी संबंधित पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकांचे त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.
फोंडा पोलिसांनी गॅस सिलिंडर चोरीच्या प्रकरणी तालेवाडा, बेतोडा येथील शुभम् गावकर यांना अटक केली होती. त्याने अन्वेषणात चोरी केल्याचे मान्य केले. तो आणि त्याचा सहकारी विश्वेश सालेलकर (बेतोडा) यांच्याकडून वाहन आणि गॅस सिलिंडर कह्यात घेण्यात आले आहेत. अन्य एका प्रकरणात रजत नाईक, देवसरण श्याम आगारिया, बेतोडा (मूळ मध्यप्रदेश); महंमद अली, बेतोडा (मूळ उत्तरप्रदेश) यांच्याकडून ६ गॅस सिलिंडर कह्यात घेण्यात आले.
या दोन्ही प्रकरणांचे अन्वेषण करतांना ४ मंदिरांतील चोर्यांचाही छडा लागला आहे. गांजे येथील श्री गांजेश्वरीदेवीचे मंदिर, पिळये धारबांदोडा येथील श्री भूमिकादेवीचे मंदिर, नार्वे, डिचोली येथील मनसादेवीचे मंदिर, वाळपई येथील घुमटी आणि काणकोण येथील एक मंदिर, या मंदिरांतून चोरी केलेले पितळ्याचे साहित्य कह्यात घेण्यात आले आहे. हे साहित्य १२ लाख ८५ सहस्र रुपयांचे असून ते बेतोडा, फोंडा येथे भंगारअड्डा चालवणारा अब्दुल सलामनी याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे. वाळपई आणि डिचोली येथील चोरीच्या प्रकरणांच्या अन्वेषणासाठी संबंधित आरोपींना संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे.