स्वतःच्या कृतीतून साधकांना शिकवणारे आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘मी मुंबई सेवाकेंद्रात वास्तव्यास असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला स्वतःच्या कृतीतून कसे शिकवले आहे ?’, याविषयी माझ्या लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिका समोर आल्यावर तिच्याशी संवाद साधून आपुलकीने वागणे

वर्ष १९९७ मध्ये एकदा मी महाविद्यालयातून मुंबई सेवाकेंद्रात परत आले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) ठाणे येथे त्रैमासिक बैठकीसाठी जाणार होते. तेव्हा त्यांनी मला गमतीने म्हटले, ‘‘युवराज्ञी ठाण्याहून आली. आता आम्ही ठाण्याला जाणार !’’ यातून मला शिकायला मिळाले, ‘ते प्रत्येक साधकाशी संवाद साधतात. प्रत्येकाशी आपुलकीने वागतात.’ तेव्हा मी पुष्कळ लहान होते. सेवाही विशेष करत नव्हते, तरीही मी पुढ्यात आल्यावर ते माझ्याशी संवाद साधून माझ्याशी आपुलकीने वागायचे.

सुश्री (कु.) युवराज्ञी शिंदे

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेच्या आईशी दूरभाषवर संवाद साधून तिला आनंद देणे 

एकदा माझ्या आईने मुंबई सेवाकेंद्रातील साधकांसाठी एक खाद्यपदार्थ बनवून पाठवला होता. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘आईला दूरभाष लावून दे. मी बोलतो.’’ दूरभाष लावून दिल्यावर ते आईला म्हणाले, ‘‘खाद्यपदार्थ छान झाला होता. बरं झालं, तुम्ही ‘रेशनिंग’ (टीप) लावलं नाही. मुलांना आनंद घेता आला.’’ त्यांनी अशा प्रकारे दूरभाषवर आईशी बोलून तिला आनंद दिला. आताही तो प्रसंग आठवल्यावर आईला आनंद होतो; कारण तिच्या एका छोट्याशा कृतीची श्री गुरूंनी दखल घेतली होती. यावरून माझ्या लक्षात आले, ‘प.पू. डॉक्टर प्रत्येक साधकाला महत्त्व देऊन त्याला भरभरून आनंद देतात.’

(टीप – मर्यादित प्रमाणात केला जाणारा अन्नधान्य पुरवठा.) साधिकेच्या आईने तो पदार्थ मोठ्या प्रमाणात पाठवला होता. त्यामुळे सर्व साधकांना तो पुरेसा खाता आला; म्हणून प.पू. डॉक्टर असे म्हणाले.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘प्रत्येकाचे ऐकणे आणि प्रत्येकाच्या म्हणण्याला महत्त्व देणे’, हे स्वतःच्या कृतीतून शिकवणे 

एकदा प.पू. डॉक्टरांना पुष्कळ सर्दी झाली होती. त्यांचे नाक शिंकून लाल झाले होते. माझ्याकडे सर्दीसाठी हॉमिओपॅथीचे एक औषध होते. मला त्यांची स्थिती पहावत नव्हती; म्हणून मी आणि अनुताई (आताच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर) यांनी जाऊन त्यांना ते औषध दिले. ते स्वतःच डॉक्टर असल्याने ‘त्यांना कसे द्यायचे ?’, असाही संकोच आमच्या मनात होता; मात्र त्यांना ते औषध दिल्यावर त्यांनी लगेच ते आमच्या समोरच घेतले. या प्रसंगातून मला शिकायला मिळाले, ‘ते प्रत्येकाचे ऐकतात आणि प्रत्येकाच्या म्हणण्याला महत्त्व देतात.’

– सुश्री (कु.) युवराज्ञी शिंदे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.३.२०२४)