दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सोनसाखळी चोरणारे २ धर्मांध अटकेत !; मर्सेडिसने चिरडल्याने तरुणाचा मृत्यू !
सोनसाखळी चोरणारे २ धर्मांध अटकेत !
घणसोली – येथे सकाळी फिरायला गेलेल्या सौ. मनीषा निकम (वय ४० वर्षे) यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी खेचून चोरली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील आरोपी मुंब्रा परिसरात रहात असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्याकडून दुचाकी आणि दागिने असा एकूण २ लाख ९० सहस्र रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. वसिम नूर महंमद शेख आणि नोमान ईरफान अहमद शेख अशी आरोपींची नावे आहेत. सध्या त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका : गुन्हेगारीत पुढे असणार्या धर्मांधांना कठोर शिक्षाच करायला हवी !
मर्सेडिसने चिरडल्याने तरुणाचा मृत्यू !
ठाणे – येथे २१ ऑक्टोबर या दिवशी ‘हिट अँड रन’ची घटना घडली. मर्सेडिस वाहनाने २१ वर्षांच्या तरुणाला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दर्शन हेगडे असे मृत तरुणाचे नाव आहे. चालक फरार असून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या येथील निवासस्थानापासून काही अंतरावर हा अपघात घडला. घटनास्थळाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही बंद स्थितीत होते. (याला उत्तरदायी कोण ? – संपादक)
अल्पवयीन मुलावर अत्याचार : गुन्हा नोंद !
मुंबई – बालनिरीक्षण गृहात १७ वर्षांच्या मुलावर अत्याचार झाल्याची तक्रार डोंगरी पोलिसांना प्राप्त झाली. या प्रकरणी पोलिसांनी १६ वर्षांच्या मुलावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. १६ वर्षांच्या मुलाने पीडित मुलाच्या तोंडात पांढर्या रंगाची पावडर कोंबल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विमानांमध्ये बाँब असल्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली पीडित मुलाला नुकतेच कह्यात घेण्यात आले होते. या प्रकरणी त्याला डोंगरी येथील बालनिरीक्षण केंद्रात आणण्यात आले होते. येथील शौचालयात हा प्रकार घडला.
निवडणुकीच्या घोषणापत्रासाठी भाजपने मागवल्या सूचना !
मुंबई – येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी घोषणापत्रात समावेश करण्यासाठी भाजपने नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. ‘visionformaharashtra@gmail.com’ या मेलवर किंवा ९००४६१७१५७ या व्हॉट्सॲप क्रमांकावर सूचना पाठवण्याचे आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे. या सूचनांतून महाराष्ट्राचा पुढील ५ वर्षांसाठीचा सर्वसमावेशक विकास आराखडा सिद्ध करण्यात येईल’, असे भाजपने आवाहनात म्हटले आहे.