दिवाळीनिमित्त खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासी भाड्यांमध्ये दुप्पटीने वाढ !

दिवाळीनंतर परतीचा प्रवासही महाग !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – दिवाळी सणाचे निमित्त साधत यंदाही खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी प्रवासी भाड्यांमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. खासगी ट्रॅव्हल्सचालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. याकडे वाहतूक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरातून प्रतिदिन अनेक ट्रॅव्हल्स चालकांच्या माध्यमांतून ९०० गाड्यांतून प्रवासी वाहतूक केली जाते. त्या सर्व गाड्यांची आगाऊ नोेंदणी आधीच झालेली आहे. दिवाळी सणाच्या काळामध्ये प्रवाशांची संख्या अधिक असते. अनेक बसचालक गाड्या दुसर्‍यांकडून भाडेतत्त्वावर चालवण्यास घेत असतात. त्यामुळे अशा खासगी गाड्यांचे तिकिट दर अधिकचे घेतले जातात. (याविषयी प्रशासन आणि पोलीस काय करणार आहेत ? प्रवाशांची होणारी ही लूट केव्हा रोखणार ? – संपादक)

दिवाळीनंतर परतीच्या प्रवासाचेही तिकीट दर अधिक असतात. कोणत्याही परिस्थितीत नोकरीच्या निमित्ताने पुण्याला यावे लागत असते. त्या वेळी एस्.टी. बस आणि रेल्वेचे आरक्षण संपलेले असते. प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सवर अवलंबून रहावे लागते. अशा वेळी ते दिवाळीचे म्हणजे येण्याचे जे भाडे असते, त्यामध्ये आणखी ४०० ते ५०० रुपये अधिकचे भाडे घेतात. त्यामुळे परतीचाही प्रवास हा महाग असतो, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

२ दिवसांपूर्वी भावाने गावी (केज) जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध नसल्याने बसचा पर्याय निवडला. नेहमी ७०० रुपये भाडे असतांना ट्रॅव्हल्सने १ सहस्र २०० रुपये घेतले. ते प्रवाशांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेत सणासुदीच्या दिवसांमध्ये अधिकचे भाडे घेतात. प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड म्हणाल्या, ‘‘खासगी वाहतूक संघटनांना आर्.टी.ओ.च्या नियमांचे उल्लंघन न करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सणासुदीच्या काळांमध्ये पडताळणीसाठी एक समर्पित पथक तैनात केले आहे.- श्री. महेश शेटे, प्रवासी

संपादकीय भूमिका :

हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रवासी भाडेवाढ करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर कुणाचा वचक नसणे संतापजनक !