जत (सांगली) तालुक्यातील उमदी येथे आंतरराष्ट्रीय जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड !

५० लाख रुपयांचा माल जप्त !

प्रतिकात्मक चित्र

सांगली, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावर्ती असणार्‍या जत तालुक्यातील कोंतेबोबलाद येथील सर्वांत मोठ्या जुन्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी धाड घालून तब्बल ५० लाख रुपयांहून अधिक रकमेचा माल जप्त केला आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. या कारवाईत २० लाख रुपयांची रोकड, ४२ भ्रमणभाषसंच, चारचाकी, दुचाकी असा माल जप्त करण्यात आला. या धाडीनंतर उमदी पोलीस ठाण्याच्या प्रभारींना हटवण्याचे संकेत पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिले आहेत. (पोलिसांची सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही उमदी येथील पोलीस अधिकार्‍यांना या जुगार अड्ड्याची माहिती होत नाही, हे लज्जास्पद आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे ! – संपादक)     

सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील, तसेच कर्नाटक राज्यातील काहींनी मिळून सीमाभागात असलेल्या कोंतेबोबलाद येथे आंतरराष्ट्रीय जुगार अड्डा चालू केला होता. या अड्ड्यावर कर्नाटकातील जुगारी येत होते. प्रतिदिन लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक फुलारी यांना खबर्‍यांद्वारे मिळाली होती. (पोलीस महानिरीक्षकांना जी माहिती समजते; ती पोलीस अधीक्षकांना का समजत नाही ? याची संपूर्ण चौकशी करून सर्वच दोषी अधिकार्‍यांवर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

पोलिसांनी आतापर्यंत जुगार अड्ड्यांवर जुजबी कारवाई केल्यामुळे ठराविक दंड भरल्यानंतर पुन्हा हे जुगार अड्डे चालू होतात. जुगार अड्डे चालूच होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी स्वत:चे कर्तव्य पार पाडले पाहिजे !