छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘श्री शिवप्रताप’ या ओवीबद्ध शिवचरित्र पारायणास प्रारंभ !
जयसिंगपूर (कोल्हापूर) – येथील ‘गीता परिवार शाखे’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘श्री शिवप्रताप’ या ओवीबद्ध शिवचरित्राच्या ३ दिवसांच्या पारायण कार्यक्रमास २० ऑक्टोबरपासून प्रारंभ करण्यात आला. ‘गीता परिवार’चे संस्थापक प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी ‘संपूर्ण महाराष्ट्रभर या पवित्र श्री शिवचरित्राची १ लाख पारायणे व्हावीत’, अशी इच्छा व्यक्त केली होती. याच अनुषंगाने गीता परिवार शाखा जयसिंगपूरच्या वतीने स्वामी समर्थ दरबार, गल्ली क्रमांक ५ येथे हे पारायण होत आहे. या प्रसंगी स्वामी समर्थ दरबारचे प्रमुख गोवर्धनआण्णा दबडे, माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, माजी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, गीता परिवाराच्या प्रमुख प्रमिलादीदी माहेश्वरी, भाजप जिल्हा चिटणीस राजेंद्र दाईंगडे, माजी नगरसेवक राहुल बंडगर उपस्थित होते.
या पारायणामध्ये ह.भ.प. रमाकांत संकपाळ आणि ह.भ.प. सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ५१ शिवभक्त सहभागी झाले आहेत. महिलांची संख्या लक्षणीय आहे. पारायण यशस्वी करण्यासाठी भगवंत जांभळे, अर्चना सोमाणी, विद्या मणियार यांसह ‘अर्जुन युवा मंच’, तसेच विविध मान्यवरांचा सहभाग आहे. यात हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे सहभागी आहेत.