हिंदुत्वनिष्ठ पक्षांनी घोषणापत्रात ‘एन्.आर्.सी.’चा समावेश करून घुसखोरांना बाहेर काढावे ! – नितीन शिंदे, हिंदु एकता आंदोलन

सांगली, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – सर्व पक्षांनी स्वतःच्या घोषणापत्रात ‘एन्.आर्.सी.’(राष्ट्रीय नागरिकता नोंदणी)चा समावेश करणे आवश्यक आहे. विशेषतः हिंदुत्वनिष्ठ पक्षांनी स्वतःच्या घोषणापत्रात ‘एन्.आर्.सी.’चा समावेश करून घुसखोरांना महाराष्ट्रातून बाहेर काढले पाहिजे, तसेच ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्र अभियाना’ला सर्व राष्ट्रभक्त आणि देशभक्त यांनी पाठिंबा देऊन हे आंदोलन यशस्वी केले पाहिजे, असे प्रतिपादन ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी २२ ऑक्टोबर या दिवशी येथे केले. (घुसखोरांना बाहेर काढावे, असे राजकीय पक्षांना सांगावे का लागते ? त्यांना ते लक्षात येत नाही का ? – संपादक)

२१ ऑक्टोबरपासून ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्र अभियाना’चे प्रमुख आणि ‘सुदर्शन’ वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके हे सांगली दौर्‍यावर आले आहेत. त्या वेळी श्री. नितीन शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्र अभियाना’ला हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने पाठिंबा दिला, तसेच श्री. नितीन शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सर्वश्री नितीन देशमाने, बाळासाहेब मोहिते, पैलवान प्रदीप निकम आदी उपस्थित होते.

श्री. नितीन शिंदे पुढे म्हणाले की, बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर मुसलमानांमुळे राज्यात धोका निर्माण झाला आहे.या घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांनी आपला रोजगार अन् नोकर्‍या काढून घेतल्या आहेत. या घुसखोरांना मुंबईपासून महाराष्ट्रातील गावापर्यंत नियोजनबद्धरित्या त्यांचे आधारकार्ड, शिधापत्रिका काढून देशाचे नागरिक बनवण्यात येत आहे. त्यांना स्थिरस्थावर करण्याचे काम काही कट्टरपंथीय मुसलमान संघटना करत आहेत. याला प्रतिबंध घालण्यासाठी श्री. सुरेश चव्हाणके यांच्या ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्र अभियाना’ला पाठिंबा देणे आवश्यक आहे.