सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्त राजस्थान येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. त्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना राजस्थान येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. श्रीमती अर्चना लढ्ढा, सोजत, राजस्थान.

१ अ. ब्रह्मोत्सवाच्या आधी

१ अ १. सेवेसाठी घरातून निघण्यापूर्वी पाऊस पडणे, घरातून निघतांना पाऊस थांबणे आणि पाऊस थांबल्यावर ‘मार्गात गाडीच्या पुढे सप्तरंगी तेजस्वी प्रकाश पुढे पुढे जात आहे’, असे दिसणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव होणार आहे’, असे समजण्याच्या १ आठवडा आधी मी अर्पण मिळवण्यासाठी सोजत शहरात जाण्याच्या आधी १ घंटा पाऊस पडत होता. मी घरातून निघतांना पाऊस पूर्णपणे थांबला. मी दुचाकी गाडी चालवत असतांना मला मार्गात १ मिनिटापर्यंत सप्तरंगी तेजस्वी प्रकाश माझ्या गाडीच्या पुढे पुढे जातांना दिसला.

१ अ २. आमच्या बागेतील जास्वंदीच्या झाडाला मागील १ वर्षापासून फुले आली नव्हती; मात्र ब्रह्मोत्सवाच्या २ दिवस आधी त्या झाडावर २ सुंदर फुले उमलली. ते पाहून मला वाटले, ‘ती फुलेही आनंदाने गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करत आहेत.’

१ आ. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी एका फांदीच्या रूपात एक रोप लाल फुलांसह उमलणे : आम्ही घरातील बागेच्या एका लहान भागात माती टाकली आहे; पण आम्ही तेथे कोणतेही रोप लावले नव्हते. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी तेथे एक रोप लाल फुलासह आले. आम्हाला ते पाहून पुष्कळ आनंद होत होता. ते रोप केवळ १ दिवसासाठीच उगवले आणि नंतर पूर्णपणे नष्ट झाले.

१ इ. ब्रह्मोत्सवाच्या वेळी आलेल्या अनुभूती

१ इ १. ब्रह्मोत्सव आरंभ व्हायला ५ मिनिटे असतांना घरातील वातावरणात पालट होऊन ‘संपूर्ण वास्तू हलकी झाली आहे आणि ती हवेत तरंगत आहे’, असे जाणवणे : ‘ब्रह्मोत्सव आरंभ होण्यापूर्वी मला शारीरिक त्रास झाले. मला शरीर जड झाल्याचे जाणवत होते. ब्रह्मोत्सव आरंभ व्हायला ५ मिनिटे असतांना आमच्या घरातील वातावरणात पालट झाला. ‘वास्तू हलकी होऊन ती हवेत तरंगत आहे’, असे मला जाणवत होते.

१ इ २. सनातनचे तिन्ही गुरु आसनस्थ असलेला रथ पाहून आलेल्या अनुभूती : परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आसनस्थ असलेला रथ पाहून माझे मन निर्विचार झाले. मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते. ‘सनातनचे तिन्ही गुरु माझ्या हृदयात आहेत’, असे मला वाटले.

१ इ ३. मैदानात बसलेल्या अनेक साधकांना पाहून माझे मन आनंदाने डोलत होते.’

२. कु. पूनम लढ्ढा सोजत, राजस्थान.

२ अ. ब्रह्मोत्सवातील चैतन्याने त्रास दूर होऊन ब्रह्मोत्सव सहजतेने पाहू शकणे : ‘ब्रह्मोत्सवाच्या वेळी माझे मन पुष्कळ शांत होते. प्रत्येक वर्षी जन्मोत्सवाच्या निमित्त असलेला सोहळा पहातांना मला झोप येत होती. त्यामुळे मी जन्मोत्सवाच्या निमित्तचा सोहळा अर्धवट पहात होते; मात्र ब्रह्मोत्सवातील चैतन्याने माझे सर्व त्रास दूर होऊन मला झोप आली नाही. या वेळी मी सहजतेने संपूर्ण सोहळा पाहू शकले.’

३. श्री. दीपक लढ्ढा, सोजत, राजस्थान.

३ अ. मनात आनंदाच्या लहरी उठणे आणि जीवनातील मोक्षगुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) महत्त्व लक्षात येणे : ‘ब्रह्मोत्सव साजरा करण्यामागचे वास्तविक कारण मला समजले. ब्रह्मोत्सवाच्या वेळी सांगितले गेले, ‘विष्णु हा उत्सवप्रिय आहे आणि उत्सव साजरा करणे’, ही एक प्रकारे ईश्वर भक्तीच आहे.’ ब्रह्मोत्सवाला आरंभ झाल्यानंतर माझ्या मनात सतत आनंदाच्या लहरी उठत होत्या. साधिका भक्तीगीते म्हणत असतांना आणि नृत्य करत असतांना ‘मोक्षगुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) आमच्या जीवनात आले’, याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.                  (क्रमशः)

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २०.५.२०२३)

या लेखाचा पुढील भाग वाचण्याकरीता  येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/847501.html

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक