वीरशैव लिंगायत हिंदूच असल्याने शासनाने त्याला स्वतंत्र ‘धर्म’ म्हणून मान्यता देऊ नये ! – डॉ. विजय जंगम (स्वामी), अखिल वीरशैव लिंगायत महासंघ
मुंबई – वीरशैव लिंगायत हे हिंदूच आहेत. त्यांना शासनाने स्वतंत्र ‘धर्म’ म्हणून मान्यता देऊ नये, असे आवाहन ‘अखिल वीरशैव लिंगायत महासंघा’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम यांनी केले आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. विजय जंगम यांनी लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांविषयी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यात हे आवाहन करण्यात आले आहे.
प्रसिद्धीपत्रकामध्ये डॉ. विजय जंगम यांनी म्हटले आहे की, वीरशैव लिंगायत समाजातील अन्य मागास प्रवर्गात, तसेच अन्य प्रवर्गातील आरक्षणाचा विषय शासनाने निकाली काढावा. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत जो राजकीय पक्ष घोषणापत्रामध्ये स्पष्टपणे वीरशैव लिंगायत समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याचे वचन देईल, त्या पक्षाच्या श्रेष्ठींशी चर्चा करून समाजाला त्यांच्यासाठी मत देण्याचे आवाहन करण्यात येईल.
महासंघाचा कुणी पदाधिकारी किंवा कार्यकर्ता समाजाला गृहित धरून कुठल्याही राजकीय पक्षासमवेत हातमिळवणी करून मतदानाचा व्यवहार करेल, त्याला तातडीने महासंघातून निलंबित करण्यात येईल. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला थेट पाठिंबा देणार नाही. समाजाला गृहित धरून एकगठ्ठा मतांचा घोडेबाजार खपवून घेतला जाणार नाही.