परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेली ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची नागपूर येथील कु. कार्तिकी अश्विन ढाले (वय १३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. कार्तिकी अश्विन ढाले ही या पिढीतील एक आहे !

आश्विन कृष्ण सप्तमी (२३.१०.२०२४) या दिवशी कु. कार्तिकी ढाले हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि आजी यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.  

कु. कार्तिकी ढाले
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कु. कार्तिकी ढाले हिला १३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१.  सौ. पूनम अश्विन ढाले (कु. कार्तिकीची आई), नागपूर

१ अ. कार्तिकीने आश्रमात जाण्याच्या तळमळीमुळे अनेक गोष्टी शिकून घेणे : ‘कार्तिकीला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची पुष्कळ तळमळ होती. यापूर्वी ती आम्हाला सोडून कधीच कुठे एकटी गेली नव्हती. ती केवळ तिच्या आजींकडे एकटी रहायची. तिने आश्रमात जाण्यापूर्वी अनेक गोष्टी शिकून घेतल्या.

१ आ. कु. कार्तिकी रामनाथी आश्रमातून घरी आल्यावर तिच्यामध्ये जाणवलेले पालट !

१. कार्तिकी रामनाथी आश्रमातून घरी आल्यावर ‘तिच्या चेहर्‍यामध्ये सकारात्मक पालट झाला आहे’, असे मला जाणवले.

२. तिच्या ऐकण्याच्या वृत्तीत वाढ झाली आहे.

२. तिचे साधनेविषयीचे विचार स्पष्ट झाले आहेत.

३. तिच्यामधील गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती) भाव आणि श्रद्धा यांत वृद्धी झाली आहे.’

४. कार्तिकी रामनाथी आश्रमात असतांना तिच्या व्यष्टी साधनेच्या आढावासेविकेने कार्तिकीला ‘प्रतिदिन आपण जे करतो, ते गुरुदेवांना आत्मनिवेदन स्वरूपात सांगायचे’, असे सांगितले होते. त्याप्रमाणे ती घरी आल्यापासून ‘गुरुदेवांना सर्व सांगण्याचा प्रयत्न करत आहे’, असे तिने मला सांगितले.

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती असलेला भाव

१ इ १. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सर्वत्र आहेत’, असे कार्तिकीने सांगितल्यावर भाव जागृत होणे : एकदा मी कार्तिकीला विचारले, ‘‘रामनाथी आश्रमात गेल्यावर तुझी गुरुदेवांशी भेट झाली नाही. तेव्हा तुला काय वाटले ? तुझ्या मनाची स्थिती कशी होती ?’’ त्या वेळी ती मला म्हणाली, ‘‘आई, मी आश्रमात साधना आणि सेवा करण्यासाठी गेले होते ना ! गुरुदेवांची प्रकृती बरी नसते. ते तर सर्वत्र आहेत !’’ त्या वेळी तिचे बोलणे ऐकत असतांना माझा भाव जागृत झाला.

१ इ २. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आपले सर्वस्व आहेत’, असे कार्तिकीने सांगितल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रती कृतज्ञता वाटणे : कार्तिकी रामनाथी आश्रमातून घरी आल्यानंतर आम्ही पुणे येथील आसपासच्या काही तीर्थस्थळांचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी मी तिला प्रत्येक मंदिराचे महत्त्व सांगितले. तिने ही सर्व माहिती शांतपणे ऐकली. नंतर ती मला म्हणाली, ‘‘आई, तू सांगितलेले योग्यच आहे; पण आपले गुरुदेवच आपल्यासाठी सर्वस्व आहेत ना !’’ तिचे बोलणे ऐकून मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटली. मला वाटले, ‘कार्तिकी वयाने लहान असूनही तिचे विचार किती प्रगल्भ आहेत !

१ इ ३. आध्यात्मिक पातळी वाढल्याचे कळल्यावर कार्तिकीचा भाव जागृत होणे, तिला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटणे आणि तिचे बोलणे ऐकून मन अंतर्मुख होणे : ऑक्टोबर २०२३ मध्ये कार्तिकीच्या वाढदिवसाच्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये तिच्याविषयी एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्या वेळी तिची आध्यात्मिक पातळी वाढली असल्याचे आम्हाला समजले. तेव्हा आम्हाला पुष्कळ आनंद झाला आणि कृतज्ञताही वाटली. तेव्हा कार्तिकीलाही आनंद झाला आणि तिचा भाव जागृत होऊन तिच्या डोळ्यांत भावाश्रू आले. तिला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्या दिवशी नागपूर येथे एक शिबीर होते आणि त्यासाठी सद्गुरु स्वाती खाडये आल्या होत्या. त्या शिबिराला मी जाणार होते. तेव्हा कार्तिकी मला म्हणाली, ‘‘सगळ्यांसमोर माझे कौतुक करू नकोस. माझ्यामध्ये अजूनही पुष्कळ स्वभावदोष आहेत. गुरुदेवांना अपेक्षित असे मला बनायचे आहे.’’ तिचे हे बोलणे ऐकून माझे मन अंतर्मुख झाले.

‘परात्पर गुरुमाऊली, तुम्हीच आमच्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी साधना करून घ्या’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’

२. सौ. पुष्पा बारई (कार्तिकीची आजी (आईची आई)), नागपूर

२ अ. कार्तिकीने प्रतिदिन भ्रमणभाष करून सेवेविषयी विचारणे आणि साधकांची विचारपूस करणे : ‘कार्तिकी रामनाथी आश्रमातून घरी आल्यानंतर काही दिवसांनी मला ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या (अधिवेशनाच्या) निमित्ताने रामनाथी आश्रमात सेवेला जाण्याची संधी मिळाली. मी आश्रमात असतांना कार्तिकी प्रतिदिन मला रात्री झोपण्यापूर्वी भ्रमणभाष करून ‘‘आज काय सेवा केली ?’’, असे विचारत असे. कार्तिकी रामनाथी आश्रमात असतांना तिच्याशी जे साधक बोलायचे, त्या साधकांची ती विचारपूस करायची.

२ आ. कार्तिकी रामनाथी आश्रमातून घरी आल्यानंतर ‘तिची पुन्हा आश्रमात जायची ओढ वाढली आहे’, असे माझ्या लक्षात आले.

२ इ. ती भ्रमणभाषवर आवश्यक तेवढेच आणि हळू आवाजात बोलते.

२ ई. कार्तिकीला कोणत्याही गोष्टीची आसक्ती नाही.

२ उ. कार्तिकीला लहान मुले पुष्कळ आवडतात. ती तिच्या मावशीच्या मुलाला चांगल्या प्रकारे सांभाळते आणि तोही तिच्याकडे लगेच आकर्षित होतो.’

३. श्रीमती सुषमा पराते, नागपूर

अ. ‘९.६.२०२४ मध्ये परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने नागपूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या दिवशी कार्तिकीने पुष्कळ सेवा केली. ‘ती सेवा करतांना भगवंताच्या अनुसंधानात आहे’, असे मला वाटत होते.

आ. २१.७.२०२४ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशीही ती स्वच्छतेच्या सेवेत सहभागी झाली होती आणि त्या वेळी ‘ती थकली आहे’, असे मला जाणवत नव्हते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २२.९.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.