Australian MP Disrupts KingCharles Ceremony : ऑस्ट्रेलियाच्या संसदेत ब्रिटनचे राजे चार्ल्स यांच्या विरोधात महिला खासदाराची घोषणाबाजी !
मूळ निवासींवर ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायाचा खासदाराने केला विरोध !
कॅनबेरा – ऑस्ट्रेलिया दौर्यावर आलेले ब्रिटनचे राजे चार्ल्स यांना विरोधाचा सामना करावा लागला आहे. किंग चार्ल्स ऑस्ट्रेलियन संसदेत भाषण देण्यासाठी पोचले असता एका महिला खासदाराने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. खासदार लिडिया थॉर्प म्हणाल्या, ‘‘तुम्ही आमचे राजे नाही. तुम्ही खुनी आहात, तुम्ही येथील (ऑस्ट्रेलियातील) मूळ निवासींची हत्या केली.’’ या वेळी थॉर्प यांनी राजा चार्ल्स यांच्याकडे ‘आमची भूमी आम्हाला परत द्या. तुम्ही जे काही आमचे लुटले आहे, ते आम्हाला परत द्या’, अशी मागणी केली.
१. राजा चार्ल्स यांना विरोध करणार्या लिडिया थॉर्प पारंपरिक वस्त्रे परिधान करून संसदेत पोचल्या. घोषणाबाजी केल्यानंतर सुरक्षा अधिकार्यांनी त्यांना संसदेबाहेर काढले.
२. संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना लिडिया थॉर्प म्हणाल्या, ‘‘जोपर्यंत ब्रिटीश राजा ऑस्ट्रेलियाचा औपचारिक प्रमुख आहे, तोपर्यंत आम्ही ब्रिटीश साम्राज्याला विरोध करत राहू.’’
३. किंग चार्ल्स २०२२ मध्ये राज्याभिषेक झाल्यानंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात आले आहेत.
राजा चार्ल्स यांना ऑस्ट्रेलियात विरोध का होत आहे ?ऑस्ट्रेलियावर ब्रिटिशांचे राज्य होते. ब्रिटिशांनी ऑस्ट्रेलियात आल्यावर तेथील मूळ निवासी लोकांवर अत्याचार केले. त्यांची संस्कृती मिटवली. आजही तेथील मूळ निवासी नागरिकांना याविषयी संताप आहे. ऑस्ट्रेलियाला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले; पण तेथे घटनात्मक राजेशाही कायम आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिटिश सम्राट औपचारिकपणे राज्याचा प्रमुख मानला जातो.
वर्ष १९९९ च्या सार्वमतामध्ये ऑस्ट्रेलियन जनतेने ऑस्ट्रेलियाला ब्रिटिश साम्राज्याचे अधिराज्य बनवण्याचा प्रस्ताव नाकारला होता. वर्ष २०२२ मध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिटीश साम्राज्याशी संबंध तोडण्याच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात ब्रिटीश राजघराण्याला विरोध होत आहे. |
संपादकीय भूमिकाब्रिटिशांनी ज्या देशांवर राज्य केले, तेथील संस्कृती आणि ओळख त्यांनी मिटवली. भारतात जे घडले, तसेच अन्य देशांतही घडले. जगात ठिकठिकाणी ब्रिटीश राजघराण्याला होत असलेला विरोध हा त्याचाच एक भाग आहे. असे असतांनाही ब्रिटीश राजघराणे याविषयी क्षमा मागण्याचे सौजन्य दाखवत नाही, हेही तितकेच खरे ! |