Salute tricolor 21 times : न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीने ‘भारतमाता की जय’ म्हणत तिरंग्याला दिली २१ वेळा सलामी !

आरोपी फैजान याने ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद’ म्हटल्याचे प्रकरण

तिरंग्याला सलामी देताना आरोपी फैजान

जबलपूर (मध्यप्रदेश) – ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद’ अशी घोषणा देणारा आरोपी फैजान २२ ऑक्टोबरला जबलपूर पोलीस ठाण्यात उपस्थित राहिला. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, त्याने ‘भारतमाता की जय’ म्हणत तिरंग्याला २१ वेळा सलामी दिली. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने आरोपी फैजान याला ५० सहस्र रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन संमत करतांना खटल्याचा अंतिम निवाडा होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या मंगळवारी तिरंग्याला २१ वेळा सलामी देण्याचा आणि ‘भारतमाता की जय’ घोषणा देण्याचा आदेश दिला. त्यानुसार आरोपी फैजान याने मंगळवार, २२ ऑक्टोबरला येथील पोलीस ठाण्यात जाऊन वरील कृती केली.

‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद’ अशी घोषणा देणारा व्हिडिओ प्रसारित  झाल्यानंतर फैजानला अटक करण्यात आली होती. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपिठात हा खटला चालू आहे. जबलपूर खंडपिठात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, फैजान याने ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद’ अशी घोषणा देऊन जातीय सलोखा बिघडवण्याचा आणि राष्ट्रीय एकात्मकतेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फैजानवर करण्यात आला आहे.

आरोपीच्या मनात देशाविषयी आदर निर्माण करणे, हा उद्देश ! – न्यायमूर्ती

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती दिनेशकुमार पालीवाल यांनी अनेक अटी घालून आरोपी फैजान याला जामीन संमत केला. ज्या देशात आरोपीचा जन्म झाला आणि तो रहातो, त्या देशाविषयी आदर निर्माण करणे, हा यामागचा उद्देश आहे, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.