Khalistani Terrorist Pannun : (म्हणे) ‘व्हँकुव्हर आणि टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावास ही हेरगिरीचे केंद्रे !’

अमेरिका आणि कॅनडा देशांचा खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची गरळओक

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू

वॉशिंग्टन (अमेरिका) – कॅनडातील भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेले हेरगिरीचे जाळे (नेटवर्क) मोडून काढण्याची आवश्यकता आहे. वर्मा मुत्सद्दी कमी आणि ढोंगी अधिक आहे. व्हँकुव्हर आणि टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावास ही हेरगिरीची केंद्रे आहेत. जोपर्यंत ही दोन वाणिज्य दूतावास कायमची बंद होत नाहीत, तोपर्यंत ते हत्या आणि कॅनडाचे सार्वभौमत्व यांना आव्हान देत रहातील, असा आरोप अमेरिका अन् कॅनडा देशांचा नागरिक असणारा खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने ‘सीटीव्ही न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

पन्नूची ही मुलाखत भारताने कॅनडातून उच्चायुक्तांना परत बोलावल्यानंतर घेण्यात आली. खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या अन्वेषणामध्ये कॅनडातील भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांना लक्ष्य करून त्यांना कॅनडा सोडण्याचा आदेश देण्यात आला. यापूर्वी २० ऑक्टोबर या दिवशी भारताचे माजी उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनीही ‘सीटीव्ही’ला मुलाखत दिली होती. त्यात वर्मा म्हणाले होते की, जस्टिन ट्रुडो सरकार खलिस्तानी आतंकवाद्यांना नेहमीच प्रोत्साहन देते.

भारताला धमकी देतांना पन्नू याने म्हटले की, आम्ही खलिस्तानसाठी सार्वमत घेण्यासाठीची मोहीम चालूच ठेवणार आहेत. आम्ही कशालाही घाबरत नाही. निज्जर हत्येच्या प्रकरणात भारताचा सहभाग असणारे आणखी पुरावे समोर येतील.

संपादकीय भूमिका

  • एकीकडे भारताशी मैत्री करायची, तर दुसरीकडे स्वतःच्या देशातील भारतविरोधी नागरिकाला पाठीशी घालायचे, हा अमेरिकचा दुटप्पीपणा आहे. अशा विश्‍वासघातकी अमेरिकेला भारताने जागतिक मंचावर उघडे पाडले पाहिजे !
  • पाकिस्तानने जसे भारतविरोधी आतंकवाद्यांना पोसले आहे, तसेच अमेरिका आणि कॅनडा हे पन्नू याला पोसत असल्याने भारताने याविरोधात आता अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे !