Lawrence Bishnoi Encounter Threat : लॉरेन्‍स बिष्‍णोई याला पोलिसांनी चकमकीत ठार केल्‍यास १ कोटी ११ लाख रुपये देणार ! – क्षत्रिय करणी सेनेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष राज शेखावत

  • क्षत्रिय करणी सेनेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष राज शेखावत यांची घोषणा

  • करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्‍या केल्‍याचा राग !

क्षत्रिय करणी सेनेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष राज शेखावत व कुख्‍यात गुंड लॉरेन्‍स बिष्‍णोई

जयपूर (राजस्‍थान) – क्षत्रिय करणी सेनेने कुख्‍यात गुंड लॉरेन्‍स बिष्‍णोई याला चकमकीत ठार केल्‍यास पोलिसांना १ कोटी ११ लाख ११ सहस्र १११ रुपयांचे बक्षीस देण्‍याची घोषणा केली आहे. क्षत्रिय करणी सेनेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष राज शेखावत यांनी एक व्‍हिडिओ प्रसारित करून ही घोषणा केली आहे. लॉरेन्‍स बिष्‍णोई अमली पदार्थाच्‍या तस्‍करीच्‍या प्रकरणी सध्‍या गुजरातच्‍या साबरमती कारागृहात आहे.

१. राज शेखावत म्‍हणाले की, लॉरेन्‍स बिष्‍णोई याला कोणत्‍याही पोलिसाने चकमकीत ठार केल्‍यास त्‍याला बक्षिसाची रक्‍कम देण्‍यात येईल. केंद्र आणि गुजरात सरकार यांनी  बिष्‍णोई याला सुरक्षा पुरवणे अयोग्‍य आहे, अशी टीकाही त्‍यांनी केली.

२. राज शेखावत यांनी ‘बिष्‍णोई याला ठार का करायला हवे’, याचे कारण देतांना सांगितले की, ‘करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्‍या केल्‍याच्‍या प्रकरणी लॉरेन्‍स बिष्‍णोई याच्‍यावर करणी सेनेचा राग आहे.’

३.  ५ डिसेंबर २०२३ या दिवशी जयपूर येथे गोगामेडी यांची हत्‍या करण्‍यात आली होती. हत्‍येच्‍या काही घंट्यांनंतर लॉरेन्‍स बिष्‍णोई याने हत्‍येचे दायित्‍व स्‍वीकारले होते.

संपादकीय भूमिका

कायदा हातात घेऊन अशा प्रकारे आवाहन करणे चुकीचे असून पोलिसांनी शेखावत यांच्‍यावर कारवाई केली पाहिजे ! जर गोगामेडी यांच्‍या हत्‍येत लॉरेन्‍स बिष्‍णोई याचा हात असेल, तर कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्‍याला लवकरात लवकर शिक्षा केली पाहिजे !