Pakistan Hindu Temple Reconstruction : पाकमधील हिंदु मंदिराचा ६४ वर्षांनंतर होणार जीर्णोद्धार !

पाक सरकारने संमत केला १ कोटी रुपयांचा निधी

ऐतिहासिक बावोली साहिब मंदिराचा जीर्णोद्धार केला जात आहे, पाकिस्तान सरकारने पंजाबच्या सफरवाल शहरातील या प्रकल्पासाठी केले एक कोटी रुपयांचे वाटप !

लाहोर (पाकिस्‍तान) – पाकिस्‍तानच्‍या पंजाब प्रांतातील नारोवाल जिल्‍ह्यातील बाओली साहिब या हिंदु मंदिराच्‍या जीर्णोद्धारासाठी पाकिस्‍तान सरकारने १ कोटी पाकिस्‍तानी रुपयांचा निधी संमत केला आहे. वर्ष १९६० पासून हे मंदिर जीर्ण अवस्‍थेत आहे. पाकमधील अल्‍पसंख्‍यांकांच्‍या प्रार्थनास्‍थळांशी संबंधित असलेली ‘इव्‍हाक्‍यू प्रॉपर्टी ट्रस्‍ट’ ही संस्‍था या मंदिराचे बांधकाम करणार आहे. या मंदिराचा पाया खणण्‍याच्‍या कामालाही प्रारंभ झाला आहे. मंदिरांचे बांधकाम पूर्ण झाल्‍यानंतर ते पाक धर्मस्‍थान समितीकडे सोपवण्‍यात येणार आहे. ६४ वर्षांनंतर आता या मंदिराचे बांधकाम करण्‍यात येणार असल्‍याने गावातील हिंदूंनी आनंद व्‍यक्‍त केला आहे.

१.  या गावात कोणतेही मंदिर नसल्‍याने हिंदूंना पूजा करण्‍यासाठी लाहोर किंवा सियालकोट येथील मंदिरांमध्‍ये जावे लागत होते. त्‍यामुळे या मंदिराचे बांधकाम करावे, अशी मागणी येथील गावकर्‍यांकडून करण्‍यात येत होती.

२. पाक धर्मस्‍थान समितीचे अध्‍यक्ष सावन चंद म्‍हणाले की, गेल्‍या २० वर्षांपासून आम्‍ही मंदिराच्‍या बांधकामासाठी पाठपुरावा करतो आहे. आमच्‍या प्रयत्नांना आता कुठे यश आले आहे. त्‍यासाठी पाकिस्‍तान सरकारचे आभार मानतो. या निर्णयामुळे आता गावातील हिंदूंना गावात पूजा करता येणार आहे.

संपादकीय भूमिका

आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर ‘आम्‍ही पाकिस्‍तानमधील अल्‍पसंख्‍य हिंदूंसाठी काही करत आहोत’, हे दाखवून स्‍वतःची प्रतिमा उंचावण्‍यासाठी पाकिस्‍तान सरकार अशी कृती करत आहे. हे न समजण्‍याऐवढे हिंदू दूधखुळे नाहीत !