IAS Officer On Temple Loudspeakers : (म्‍हणे) ‘मंदिरांवर लावलेले भोंगे दूरपर्यंत ध्‍वनीप्रदूषण करतात !’ – प्रशासकीय अधिकारी शैलबाला मार्टिन

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी शैलबाला मार्टिन यांचे विधान

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी शैलबाला मार्टिन

भोपाळ (मध्‍यप्रदेश) – ‘मंदिरांवर लावलेले भोंगे दूरपर्यंत ध्‍वनीप्रदूषण करतात. ते मध्‍यरात्रीपर्यंत चालू असतात. त्‍यामुळे कुणाला त्रास होत नाही’, अशी पोस्‍ट राज्‍यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आय.ए.एस्.) शैलबाला मार्टिन यांनी ‘एक्‍स’वरून केल्‍यानंतर त्‍यांना विरोध होऊ लागला आहे. मार्टिन यांनी ही पोस्‍ट एका दूसर्‍या पोस्‍टला रिपोस्‍ट करत लिहिली होती. हिंदु संघटनांनी मार्टिन यांच्‍या पोस्‍टचा विरोध केला आहे, तर काँग्रेसने पोस्‍टचे समर्थन केले आहे.

मार्टिनबाई, तुम्‍हाला हिंदु धर्माच्‍या भावनांना धक्‍का पोचवण्‍याचा कसलाही अधिकार नाही ! – संस्‍कृती बचाव मंच

‘संस्‍कृती बचाव मंचा’चे अध्‍यक्ष पंडित चंद्रशेखर तिवारी यांनी सांगितले की, हिंदु धर्माच्‍या श्रद्धेला धक्‍का पोचवण्‍याचे काम केले, तर आम्‍ही त्‍याला विरोध करू. मंदिरांमध्‍ये सुरेल आवाजात आरती आणि मंत्र यांचे उच्‍चारण केले जाते. एका दिवसात ५ वेळा मशिंदींमधून होणार्‍या मोठ्या आवाजात अजान (नमाजपठणासाठी बोलावण्‍याचे आवाहन) होत नाही. माझा शैलबाला मार्टिन यांना प्रश्‍न आहे की, त्‍यांनी मोहरमच्‍या मिरवणुकीवर दगडफेक झाल्‍याचे पाहिले आहे का ? दुसरीकडे हिंदूंच्‍या मिरवणुकीवर दगडफेक होत आहे आणि यामुळे मार्टिनबाई, तुम्‍हाला हिंदु धर्माच्‍या भावनांना धक्‍का पोचवण्‍याचा कसलाही अधिकार नाही.

(म्‍हणे) ‘भाजप सरकारच्‍या काळात भोंग्‍यांवरील कारवाई राजकीयदृष्‍ट्या प्रेरित असते !’ – काँग्रेस

काँग्रेसचे प्रवक्‍ते अब्‍बास हफीज यांनी शैलबाला मार्टिन यांचे समर्थन करतांना म्‍हटले की, भाजप सरकारच्‍या काळात भोंग्‍यांवरील कारवाई राजकीयदृष्‍ट्या प्रेरित असते. धर्म पाहून भोंग्‍यांवर कारवाई होत असल्‍याने राज्‍याच्‍या प्रसासकीय अधिकार्‍यांना याविषयी बोलणे भाग पडले आहे. (‘काँग्रेस म्‍हणजे दुसरी मुस्‍लिम लिग असल्‍याने तिने हिंदूंच्‍या विरोधात बोलणार्‍यांचे समर्थन केल्‍यास आश्‍चर्य ते काय ?’, असे कुणी म्‍हटल्‍यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक)