नोकरी देण्याचे आमीष दाखवून पैसे लाटणार्यांची गय करणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा
नोकरीसाठी पैसे उकळणार्यांपासून जनतेने सावध रहाण्याचे आवाहन
पणजी, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – सरकारी नोकरी पैसे देऊन मिळत नाही. सरकार नोकरभरती पूर्णपणे पारदर्शकपणे राबवते. पैसे घेऊन नोकर्या देण्याची भाषा करून काही जण लोकांची फसवणूक करत आहेत. फसवणूक करणार्यांच्या विरोधात सरकार अधिक कडक भूमिका घेणार आहे. नोकरीसाठी पैसे उकळणार्यांपासून जनतेने सावध रहावे, अशी चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. सचिवालयात कामाला असल्याचे सांगत श्रावणी (पूजा) नाईक यांनी सरकारी नोकरी देण्याच्या बहाणा करून पीडितांकडून एकूण १४ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी म्हार्दाेळ पोलिसांनी संशयित श्रावणी नाईक यांना कह्यात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही चेतावणी दिली. सांखळी येथील रवींद्र भवनातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत वरील माहिती दिली.
आपेंव्हाळ, प्रियोळ येथील गुरुदास गोविंद गावडे यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी संशयित श्रावणी नाईक यांच्या विरोधात फसवणुकीसंबंधीची तक्रार म्हार्दाेळ पोलिसांत नोंदवली आहे. तक्रारदाराच्या मते संशयित श्रावणी नाईक यांनी प्रथम वाहतूक खात्यात मुलाला लिपिकाची (‘क्लार्क’ची) नोकरी देत असल्याचे सांगून ४ लाख रुपये आणि काही दिवसांनी दुसर्यांदा सार्वजनिक बांधकाम खात्यात कनिष्ठ अभियंता पदावर मुलाला नोकरी देत असल्याचे सांगून १० लाख रुपये उकळले. पैसे घेऊनही नोकरी न दिल्याचे लक्षात आल्यावर गावडे यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.
पैसे देणार्यांविरुद्धही कडक कारवाई करणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘संशयित श्रावणी नाईक यांच्या विरोधात तक्रार नोंद करण्याचे निर्देश सर्वप्रथम मीच दिले आहेत. आतापर्यंत श्रावणी नाईक यांना पैसे घेतल्याच्या प्रकरणी यापूर्वी ४ वेळा पकडण्यात आले होते. तरीही त्यांच्याकडून लोक स्वतःची फसवणूक करून घेत आहेत. त्यामुळे पैसे देणार्यांविरुद्धही कडक कारवाई केली जाणार आहे. संबंधित महिला सचिवालयात नोकरीला असल्याचे वृत्त चुकीचे आहे. ती लोकांची दिशाभूल करून फसवणूक करत आहे. काही लोक मंत्र्यांसमवेत छायाचित्रे काढून ती पुढे गरजवंतांना दाखवून त्यांची दिशाभूल करतात. अशा लोकांपासून सावध रहावे.’’