Belgian economic delegation visit Mumbai : बेल्जियमचे आर्थिक शिष्टमंडळ मुंबई दौर्यावर येणार !
|
मुंबई – बेल्जियमचे राजे फिलिप यांच्या भगिनी असलेल्या प्रिन्सेस ऍस्ट्रडि यांच्या नेतृत्वाखाली बेल्जियम येथील व्यापार-उद्योजकांचे आर्थिक शिष्टमंडळ मार्च २०२५ मध्ये भारतभेटीवर येणार आहेत. या वेळी मिशनचे सदस्य देहलीसह मुंबईला भेट देणार असल्याची माहिती बेल्जियमचे मुंबईतील वाणिज्यदूत फ्रँक गिरकेंस यांनी येथे दिली. त्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांची राजभवन येथे भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
बेल्जियमचा महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यासमवेत हिर्यांचा मोठा व्यापार आहे. बेल्जियम भारताशी ‘लॉजिस्टिक्स’ (पुरवठा साखळी), उत्पादन आणि आरोग्य सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बेल्जियम आरोग्यसेवा क्षेत्रात पुढे असून या क्षेत्रात आपण सहकार्य वाढवणार असल्याचेही ते म्हणाले. ‘भारत आणि युरोपमधील मुक्त व्यापार धोरण लवकर संमत झाल्यास उभयपक्षी व्यापार दुपटीने वाढेल’, असे राज्यपालांनी या वेळी सांगितले.