‘स्वाध्याय परिवारा’च्या माध्यमातून कृतज्ञता, ईश्वरनिष्ठा आणि आत्मगौरव यांची शिकवण देणारे प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले !

‘स्वाध्याय परिवारा’चे प्रणेते प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) यांची जयंती १९ ऑक्टोबर या दिवशी विश्वभर पसरलेल्या ‘अखिल स्वाध्याय परिवारा’च्या वतीने ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरी केली गेली. ‘भक्ती ही एक सामाजिक शक्ती आहे आणि माणसांची डोके उडवून क्रांती होत नाही, तर माणसाच्या मनातील विचार पालटून क्रांती करता येते’, यासाठी ‘भक्तीफेरी’ नामक अभिनव संकल्पना उदयाला आली. या माध्यमातून समाजातील जातीभेद, स्पृश्य-अस्पृश्य, सुशिक्षित-अशिक्षित, उच्च-नीच, धार्मिक भेदभाव टाळून अखिल विश्वामध्ये पसरलेल्या ‘स्वाध्याय परिवारा’च्या माध्यमातून मानवतेची, कृतज्ञतेची, ईश्वरनिष्ठेची, आत्मगौरवाची शिकवण दिली जाते.

प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले

१. प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी केलेले अजोड कार्य 

खरे पाहिले तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या सरकारने वा राजकीय नेते यांनी सहस्रो वर्षे परकीयांच्या गुलामगिरीत, धार्मिक जुलूम सहन करत पारतंत्र्यात जगलेल्या जनतेला काही निश्चित ध्येय धोरण ठरवून चांगली शिकवण देणे अपेक्षित होते. वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धा असलेल्या मानव समूहांना एकत्रित रहाण्याच्या दृष्टीने एक स्वस्थ, सुघटित, स्वयंशासित, साहसी, ईश्वरनिष्ठ आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करणारा एक समाज निर्माण करणे अपेक्षित होते; पण आजवर तसा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे आजही हा देश त्याची शिक्षा वेगवेगळ्या कारणाने भोगत आहे. हे कार्य सरकारने करणे अपेक्षित होते, ते कार्य प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी पुष्कळ मोठ्या प्रमाणावर त्यांच्या ‘माधवबाग पाठशाळा, मुंबई’ आणि ‘तत्त्वज्ञान विद्यापीठ, ठाणे’ यांच्या माध्यमातून केले. त्यांनी निर्मिलेल्या ‘स्वाध्याय परिवारा’च्या माध्यमातून त्यांनी जे अजोड कार्य केले, त्याची नोंद घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आशिया खंडातील ‘नोबेल पुरस्कार’ समजला जाणारा ‘मॅगेसेस पुरस्कार’, तसेच धार्मिक- सामाजिक क्षेत्रातील जगातील सर्वांत उत्कृष्ट अन् सर्वोच्च असलेल्या ‘टेम्पलटन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

श्री. अनिल दत्तात्रेय साखरे

२. सद्यःस्थितीसाठी प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी दिलेला संदेश !

जगभरामध्ये चालू असलेले धार्मिक, आर्थिक, राजकीय, वांशिक भेदाभेद, जगभरातील तणावग्रस्त परिस्थिती आणि सध्या चालू असलेली रशिया-युक्रेन अन्  इस्रायल-हमास-इराण यांच्यातील युद्धे, अशा वातावरणामध्ये दादाजींनी एकतेचा वा मानवतेचा संदेश यापूर्वीच दिला आहे. ‘आपण सगळे जण एकाच भगवंताची लेकरे आहोत. आपल्याला बनवणारा भगवंत एकच आहे. त्यामुळे जगभरातील सगळे नागरिक एकमेकांचे दैवी बंधू-भगिनी आहेत. कुटुंब, समाज, देश आणि जगभरातील आर्थिक, सामाजिक, राजकीय यांच्या समस्या या ‘भक्तीच्या बैठकी’वरच सुटू शकतील. त्यामुळेच जगामध्ये सुख, शांती नांदू शकेल.’ हा संदेश घेऊनच आज नाही, तर उद्या जगाला पुढे जावेच लागेल. असे झाले, तरच या जगामध्ये शांतता, सुव्यवस्था लाभून लोकांचे जीवनमान सुधारण्यास साहाय्य होईल.

३. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांतून ‘भक्तीफेरी’चे आयोजन

आदरणीय दीदींच्या (प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या कन्या धनश्री तळवलकर यांच्या) मार्गदर्शनाखाली आणि दादाजींनी दाखवलेल्या याच ‘भक्ती बैठकी’वर या वर्षी १३ ते १८ ऑक्टोबर असे ६ दिवस देशभरातील वेगवेगळ्या राज्यांतून ‘भक्तीफेरी’चे आयोजन करण्यात आले. दीड लाखांहून अधिक कृतीशील ‘स्वाध्यायी’ आणि स्थानिक सदस्य यांनी विविध गावे, तालुके अन् जिल्हे येथे ‘भक्तीफेरी’ काढली. या माध्यमातून विविध स्तरांतील व्यक्तींशी भक्तीपूर्ण अंतकरणाने निरपेक्ष आणि निःस्वार्थपणे संपर्क साधण्याचा प्रयत्न अभिनव पद्धतीने करण्यात आला.

– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे (पूर्व).