सौ. संगीता चव्हाण यांना दातांच्या उपचारांच्या वेळी झालेला त्रास आणि आलेली अनुभूती !

१. तिसर्‍या टप्प्यातील ‘रूट कॅनल’ करतांना दातांचा ‘एक्स रे’ व्यवस्थित न आल्याने ६ वेळा ‘एक्स रे’ काढावा लागणे; मात्र ७ व्या वेळी साधिकेने भ्रमणभाषवर मारुति स्तोत्र लावल्यावर दातांचा ‘एक्स रे’ निघणे 

सौ. संगीता चव्हाण

‘१४.९.२०२३ या दिवशी मी एका रुग्णालयात माझ्या दातांचे तिसर्‍या टप्प्यातील ‘रूट कॅनल’ (Root canal) (टीप १) करण्यासाठी गेले होते. मला सकाळी ९ वाजता उपचारांसाठी आत घेतले. माझ्यावर रूट कॅनलचे उपचार चालू होऊन बराच वेळ झाला होता. साधारण ३ घंट्यांमध्ये उपचार पूर्ण होतात; परंतु दुपारचे २ वाजले, तरीही माझ्या ‘रूट कॅनल’ झालेल्या भागाचा ‘एक्स रे’ (टीप २) निघत नव्हता. दंतवैद्यांनी ६ वेळा प्रयत्न केले. माझ्यावर उपचार करणार्‍या दंतवैद्यांना कारण लक्षात येत नव्हते. सातव्या वेळी मात्र मी माझ्या भ्रमणभाषवर मारुतिस्तोत्र लावले. तेव्हा दातांचे ‘एक्स रे’ निघाले.

टीप १ : रूट कॅनल – दाताच्या मुळाशी असलेली पोकळी स्वच्छ करण्याचे शस्त्रकर्म

टीप २ : एक्स रे – क्ष किरण तपासणी

२. उपचाराला आरंभ झाल्यानंतर थोड्या वेळाने दातांमध्ये काहीतरी अडचण निर्माण झाल्याचे लक्षात येणे  

उपचाराला आरंभ झाल्यानंतर थोड्या वेळाने अन्य २ दंतवैद्या आल्या आणि त्यांनी उपचार चालू केले. त्या सगळ्या जणी इंग्रजी भाषेत बोलत असल्याने मला त्यांचे बोलणे कळत नव्हते. जेव्हा तिसरी दंतवैद्या येऊन ती हिंदीत बोलू लागली, तेव्हा मला त्यांचे बोलणे कळले. त्या वेळी मला समजले की, माझ्या दातामध्ये काहीतरी अडचण निर्माण झाली आहे. मी त्या दंतवैद्यांना म्हटले, ‘‘काय झाले आहे ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘काळजी करण्यासारखे काही नाही. ठीक होईल.’’

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दंतोपचारातील अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करणे  

माझा नामजप अखंड चालू होता. नंतर मी प.पू. गुरुमाऊलींना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली, ‘जे काही अडथळे आहेत, ते तुम्हीच बघा. तुम्हीच मला हे सहन करण्याची शक्ती द्या.’’

४. दंतोपचाराच्या वेळी साधिकेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांचे अस्तित्व जाणवणे  

दंतोपचाराच्या वेळी मला परम पूज्य गुरुमाऊली आणि डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांचे अस्तित्व जाणवत होते. मी त्यांना मानस नमस्कार केला. नंतर मी त्याच भावावस्थेत होते. त्यानंतर एक दंतवैद्य आले आणि त्यांनी उपचारास आरंभ केला. तेव्हा २ मिनिटांत एक सुई त्या दाताखालील हिरडीतून बाहेर आली. तेव्हा सर्वांनाच नवल वाटले. जवळ जवळ अर्धा घंटा उपस्थित दंतवैद्या सुई काढण्यासाठी प्रयत्न करत होत्या, तरी त्यांना हिरडीत अडकलेली सुई निघत नव्हती. सुई पुष्कळ लांब म्हणजे करंगळीच्या एका पेराएवढी होती. मी गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर ‘रूट कॅनल’ पूर्ण होण्यासाठी ६.३० घंटे लागले होते.

५. कृतज्ञता 

गुरुमाऊलींनी शक्ती दिल्यामुळे मी हे सर्व सहन करू शकले. त्यांच्या कृपेमुळे मला रुग्णालयात त्यांची कृपा अनुभवण्यास मिळाली. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. संगीता चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.९.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक