पुणे येथील आमदार रवींद्र धंगेकर यांच्या ‘हिंदमाता प्रतिष्ठान’ विरोधात गुन्हा नोंद !
नागरिकांना दिवाळी भेट देऊन आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार !
पुणे – राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे. त्यात कसबा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ‘हिंदमाता प्रतिष्ठान’च्या माध्यमातून दिवाळीनिमित्त सुगंधी उटणे, उदबत्ती, रांगोळी अशा वस्तू असलेल्या पिशव्यांचे वाटप केले आहे. पिशवीवर धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नीचे छायाचित्र असून मतदारांना प्रलोभने दाखवण्यात आल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या ‘हिंदमाता प्रतिष्ठान’च्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, प्रतिवर्षाप्रमाणे माझा मित्रपरिवार आनंदाची दिवाळी भेट देतो. या उपक्रमामध्ये माझा व्यक्तीश: सहभाग नाही. मला अजून उमेदवारी घोषित झाली नाही.