संपादकीय : इस्रायलची विजिगीषू वृत्ती !

इस्रायलने ‘हमास’ या आतंकवादी संघटनेचा तिसरा प्रमुख याह्या सिनवार याला नुकतेच ठार केले. इस्रायलने त्याच्या घरावर केलेल्या बाँबच्या आक्रमणात सिनवार गंभीर घायाळ झाला होता. त्याचे घर बाँबने उडवल्यावर त्याच्या घरात ड्रोन पाठवून याह्या सिनवारच असल्याची निश्चिती इस्रायलच्या सैन्याने केली होती. त्याचा व्हिडिओही इस्रायलने प्रसारित केला. ७ ऑक्टोबर या दिवशी म्हणजे क्रूरकर्मा याह्या सिनवार याच्यावर आक्रमण होण्यापूर्वी तो स्वत:च्या घरात बनवलेल्या बंकरमध्ये लपण्यासाठी सामान एकत्र करतांनाचा व्हिडिओही इस्रायलने प्रसारित केला आहे. बरोबर १ वर्षापूर्वी इस्रायलवर हमासच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात १ सहस्र २०० हून अधिक ज्यू मारले गेले आणि शेकडोंना बंदी बनवण्यात आले. शेकडो ज्यू महिला-मुली यांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या केली गेली. गर्भवती महिलांचे पोट फाडून गर्भ बाहेर काढले. अशी अनेक अनन्वित नृशंस हत्याकांडे हमासच्या आतंकवाद्यांनी केली. यात याह्या सिनवार हा मुख्य ‘मास्टरमाईंड’ होता. त्यामुळे तो ठार झाल्याने खरेतर युद्ध थांबायला हवे; मात्र हमासने अद्याप पूर्णपणे आक्रमणे थांबवलेली नाहीत. मोठ्या संख्येने हमासचे आतंकवादी इस्रायलच्या सैनिकांजवळ शस्त्रे खाली ठेवून शरणागती पत्करत आहेत. खरे म्हणजे सर्व प्रमुख मारले गेल्यानंतर टोळीची वाताहत होते, टोळी संपल्यात जमा होते, तरी काही चिवट आतंकवादी बंधक बनवलेल्या नागरिकांना सोडत नाहीत, तोपर्यंत युद्ध चालूच रहाणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी तसा निर्धारच केला आहे. हमासचे कंबरडे मोडले, आता हिजबुल्लाची पाळी आहे.

गाझाचे कंबरडे मोडले !

देशावर केलेल्या आतंकवादी आक्रमणाचे दीर्घकाळ प्रत्युत्तर देऊन उत्तरदायी प्रत्येकाचा प्रतिशोध कसा घ्यायचा ? याचा आदर्शच इस्रायलने घालून दिला आहे. देशावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाची दाहकता नेतान्याहू यांनी त्वरित ओळखली आणि थेट युद्धाची घोषणा केली. ‘या युद्धात यशस्वी होऊ’, असाच आशावाद त्यांनी व्यक्त केला आणि लगोलग हमासच्या सर्व तळांवर बाँबवर्षाव होऊ लागला. आता गाझापट्टीची अवस्था इस्रायलच्या बाँबवर्षावामुळे एवढी भीषण झाली आहे की, गाझा पुन्हा उभारण्यास काही दशके लागतील. म्हणजेच शत्रूने आक्रमण केल्यावर एवढा ताकदवान प्रतिकार करायचा की, शत्रूला पुन्हा काही दशके उठताही येणार नाही, हाच धडा इस्रायलच्या रणनीतीमध्ये दिसतो. गत १ वर्षात इस्रायलमधील अन्य व्यवहार आणि उत्पादने चालू आहेत. नागरिक त्यांचे जीवन व्यवस्थित जगत आहेत. इस्रायलच्या सीमावर्ती भागात तेवढेच दहशतीचे वातावरण आहे. हमासला जवळजवळ नेस्तनाबूत केल्यामुळे एका बाजूकडील धोका अल्प झाला असला, तरी दुसरी आतंकवादी संघटना ‘हिजबुल्ला’ आता रडारवर आहे.

गत १ वर्षात इस्रायली सैन्याचे मनोधैर्य कुठेही अल्प झालेले दिसत नाही. उलट शत्रूला तंत्रज्ञान, रणनीती यांद्वारे लवकरात लवकर कसे नष्ट करता येईल ? अशीच त्याची विजिगीषू वृत्ती दिसते. त्यामुळे जग काय म्हणेल ? आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, संयुक्त राष्ट्रे हे काय म्हणतील ? ते काय चेतावण्या देत आहेत, याकडे इस्रायलने लक्ष दिलेले नाही. अनेक प्रसारमाध्यमे इस्रायलविरोधी वार्तांकन करत असल्यामुळे त्यांच्या प्रतिनिधींना कारागृहात टाकण्यात आले आहे. त्यांच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे. ‘रेडक्रॉस’ संघटनेच्या पथकाला गाझात जाण्यापासून परावृत्त करण्यासाठीही त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले आहे. काही इस्रायलविरोधी पत्रकारांनाही यमसदनी पाठवले आहे. ४१ सहस्रांहून अधिक पॅलेस्टाईन नागरिकांचा या आक्रमणात मृत्यू झाला आहे, काही लाख लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. असे असूनही कोणत्याही प्रकारची दया इस्रायलने दाखवलेली नाही. हमाससह हिजबुल्ला, हुती आणि इराण अशा ४ आघाड्यांवर इस्रायलला युद्ध करावे लागले. इस्रायलवर हिजबुल्ला, इराण यांच्याकडून क्षेपणास्त्र आक्रमणे झाली, तरीही इस्रायल बधला नाही. केवळ उद्दिष्ट ठरवून अचूक आक्रमण करत रहाणे, शत्रूचे सामर्थ्य आणि त्याला असलेला पाठिंबा यांचा विचार न करता त्याला टिपत रहाणे, एवढीच गोष्ट इस्रायलने लक्षात घेतली आहे.

आता हिजबुल्लाची पाळी !

हिजबुल्लाकडे १ लाखांहून अधिक आतंकवादी असल्याचे समजते. हिजबुल्लाला आश्रय देणार्‍या लेबनॉनला ‘गाझासारखी अवस्था करू’, अशी धमकी देण्यात आली आहे. या आक्रमक पावित्र्यामुळे स्वत:चे महत्त्व या भागात प्रस्थापित करण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करणारा महत्त्वाकांक्षी इराण इस्रायलवर रॉकेट डागून स्वत: मात्र घाबरला आहे. इस्रायल त्याच्यावर कधी मोठे आक्रमण करील ? ते कसे करील ? याच्याच भयाने इराणच्या प्रमुखालाही वारंवार स्वत:चे निवासस्थान पालटावे लागत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नावे, अन्य देशांच्या नावे इस्रायलला समजावण्यास सांगण्यासाठी गयावया करणारे संदेश इराणच्या राजकीय मुत्सद्यांकडून प्रसारित करण्यात येत आहेत. असे असतांना बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी याचे दायित्व घेण्यास ना हिजबुल्ला पुढे येत आहे, ना कोणती आतंकवादी संघटना ! इराणने तर ‘आम्ही ते केलेलेच नाही, हिजबुल्ला असू शकते’, असा पवित्रा घेतला आहे. इराणचे क्षेत्रफळ खरेतर इस्रायलच्या अनेक पट म्हणजे ७० पट मोठे आहे. तिन्ही सेनादलांनी सुसज्ज आणि अण्वस्त्रसज्जही आहे. असे असूनही छोट्याशा इस्रायलपुढे तो आताच नांगी टाकत आहे. आताही कोणत्याही आतंकवादी गटाने आक्रमण केले, तरी ते इराणकडूनच आहे, असे इस्रायलच्या मंत्र्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे इराणवर आज ना उद्या आक्रमण होईलच, याची निश्चिती आहे. इस्रायल हा जगाच्या नकाशावर ज्याचे स्थान सहज शोधून सापडणार नाही एवढा चिमुकला देश आहे; मात्र जगातील बलाढ्य आतंकवादी संघटनांशी लढण्यात, त्यांचे अस्तित्व संपवून टाकण्यास सक्षम आहे. खरेतर भारताने इस्रायलकडून पुष्कळ गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. भारत अनेक दशके जिहादी आतंकवादाचा सामना करत असूनही पाक आणि चीन यांच्यासारखे कपटी, आक्रमक देश शेजारी असूनही भारताने प्रथम आक्रमण धोरण अवलंबलेले नाही. आतंकवादाचा समूळ नायनाट केला नाही. त्याचे परिणाम आपण अजून भोगत आहोत. भारतीय शासनकर्त्यांनी इस्रायलचे अनुसरण केल्यास भारत काही मासांमध्ये आतंकवादमुक्त होईल, यात शंकाच नाही !

आतंकवाद कसा संपवायचा ? विजिगीषू वृत्ती सतत जागृत कशी ठेवायची ? हे भारताने इस्रायलकडून शिकणे आवश्यक !