सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरण गेल्यावर साधिकेच्या मनःस्थितीत झालेले पालट
१. मुलीला पूर्णवेळ होण्यास विरोध करणे
‘जून २०२३ मध्ये मी पुष्कळ निराश झाले होते. त्याच काळात माझ्या थोरल्या मुलीने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. ‘तिच्या चंचल स्वभावामुळे ‘न घर का न घाट का !, म्हणजे कुठेही उपयोगी न पडणारा’, अशी तिची अवस्था झाली तर ?’, या विचाराने मी चिंताग्रस्त झाले होते. त्यामुळे अवनीने (कु. अवनी छत्रे) पूर्णवेळ साधना करण्यास माझा विरोध होता. माझ्या अशा मनःस्थितीमुळे माझी चीडचीडही होत होती.
२. ‘प्रारब्ध सहन करण्याची शक्ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले देतील’, असा भाव ठेवून स्वतःला सेवेत गुंतवणे
नोव्हेंबर २०२३ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील वैद्यकीय सेवा करणार्या साधकांनी ‘पंचकर्म सेवा करण्यासाठी आश्रमात येऊन सेवा करू शकता का ?’, असे मला विचारले. त्या वेळी ‘आश्रमात जाऊन सेवा करण्यातच माझे हित आहे’, असे माझ्या दोन्ही मुलींनी (कु. अवनी छत्रे आणि कु. सुरभी छत्रे यांनी) मला पटवून दिले आणि मला प्रोत्साहनही दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी रामनाथी आश्रमात सेवेला जाऊ लागले. मला वाटायचे, ‘एकदा तरी मला परात्पर गुरु डॉक्टरांशी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी) बोलता येईल का ?’ त्यानंतर ‘मला प्रारब्ध सहन करण्याची शक्ती परात्पर गुरु डॉ. आठवले देतील’, असा भाव ठेवून मी स्वतःला सेवेत गुंतवून घेतले.
३. आश्रमात सेवेसाठी जाऊ लागल्यावर मुलीला पूर्णवेळ साधना करण्यास असलेला विरोध मावळणे
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या आरंभीच्या काळात मी आश्रमात स्वयंपाकघरात काही दिवस सेवेला जात होते. पुढे घराच्या दायित्वामुळे मी सेवेला जाऊ शकत नव्हते. आता आश्रमात पुन्हा सेवेसाठी जाऊ लागल्यावर मला आनंद मिळू लागला. आता माझा अवनीला असलेला विरोध मावळला आणि ती पूर्णवेळ साधना करू लागल्याबद्दल माझा पूर्ण पाठिंबा आहे.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या भेटीची तळमळ वाढल्यावर त्यांचे स्वप्नात दर्शन झाल्याने भावजागृती होणे
परात्पर गुरु डॉक्टरांना भेटण्याचा विचार माझ्या मनात तीव्रतेने येत राहिला. ‘परात्पर गुरु डॉक्टर मला कसे भेटतील ? माझी काही तेवढी साधना नाही’, अशी मी माझ्या मनाची समजूत काढत होते. काही दिवसांनंतर परात्पर गुरु डॉक्टर माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले, ‘मला भेटायचे होते ना ? बोल ! काय बोलायचे आहे, ते बोल.’ अंतर्यामी परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाल्यामुळे मला आभाळ ठेंगणे वाटू लागले. मी स्वत:ला सावरत त्यांच्या चरणी शरणागतभावाने मस्तक ठेवले. स्वप्नातून जागी झाल्यावर माझी भावजागृती होत राहिली. मी दिवसभर पुन:पुन्हा त्या स्वप्नात रमत राहिले.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वप्नात दर्शन देऊन ‘निराशेतून मुक्त करून अभय दिले’, असे साधिकेला वाटणे
नातेवाइकांमुळे मला मानसिक त्रास झाला होता. या कारणामुळे सुमारे ५ ते ६ महिने मी निराशेच्या गर्तेत सापडले होते; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांनी मला स्वप्नात दर्शन देऊन निराशेतून मुक्त केले. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे !’, या श्री स्वामी समर्थांच्या वचनाप्रमाणे, जणू काही ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला अभय दिले’, असे मला वाटले.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक कोटीशः नमस्कार !’
– सौ. आरती दीपक छत्रे , बांदोडा, फोंडा, गोवा. (२९.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |