महाराष्ट्र आणि गोवा येथील ५ सहस्र ५०० धार्मिक स्थळांची स्वच्छता
६० सहस्रांहून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग, विहिंपचा उपक्रम !
नागपूर – विश्व हिंदु परिषदेच्या ‘मंदिर अर्चक पुरोहित आयामा’ने केलेल्या मंदिर स्वच्छता अभियानाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा येथे हे अभियान राबवण्यात आले. विश्व हिंदु परिषदेसह विविध संस्था, संघटना, उपासना मंडळ, धार्मिक-सामाजिक संस्था, सर्व मंदिरे यांच्या ६० सहस्रांहून अधिक भाविक, महिला आणि पुरुष यांनी मंदिरे, बौद्ध विहार, जैन स्थानक, गुरुद्वारे, तसेच हिंदु धर्मातील सर्व धार्मिक स्थाने अशा एकूण ५ सहस्र ५०० धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या अभियानाचे हे दुसरे वर्ष आहे.
१. देवगिरी प्रांतात १ सहस्र ८५०, कोकणामध्ये १ सहस्र ५००, विदर्भात १ सहस्र २१०, पश्चिम महाराष्ट्र प्रांतात ८५० आणि गोवा राज्यात १५० या संख्येने ही मंदिर स्वच्छता सेवा करण्यात आली.
२. २० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ७ ते ११ या ४ घंट्यांत हे अभियान सर्वदूर राबवले गेले. मागील वर्षापासून मंदिर आयामाच्या वतीने उपक्रम राबवणे चालू झाले आहे. मागच्या वर्षी ५५० मंदिरांमध्ये स्वच्छता सेवा केली होती.
३. मंदिर स्वच्छता अभियानासाठी मागील १ महिन्यापासून सिद्धता चालू होती. यासाठी विविध संस्था-संघटनांसमवेत बैठका पार पडल्या. मंदिरांसह सर्व धार्मिक स्थानांची सूची सिद्ध करण्यात आली. मंदिर स्वच्छतेसाठी आवश्यक ते साहित्य झाडू, खराटे, इलेक्ट्रिक ब्लोअर इत्यादींची उपलब्धता स्थानिक स्तरावर करण्यात आली.
४. ‘मंदिर स्वच्छता अभियानात नागरिकांनी सहभाग नोंदवावा’, अशा आशयाचे ३ सहस्र ५०० फलक मंदिरांवर लावण्यात आले होते. ते वाचून अनेक भाविक महिला-पुरुष अभियानात सहभागी झाले. अनेक मंदिरांनी आपल्या मंदिरांसमवेत दुसर्या मंदिराचे दायित्व घेत तिथेही स्वच्छता सेवा केली.
मंदिरावर ध्वज आणि रोषणाई !
सर्व मंदिरांनी दिवाळीच्या आधी मंदिरावर नवीन ध्वज लावावा. दीपावलीच्या काळात ४ दिवस रोषणाई करावी आणि समाजाच्या विविध जातींच्या तरुण जोडप्यांच्या हस्ते ध्वजपूजन करावे. हे मंदिर प्रत्येक हिंदु समाजाचे आहे. प्रत्येकाला त्यात स्थान असून संधी आहे. समरसतेचा भाव कृतीतून जागृत करावा, अशी विनंती सर्व मंदिर विश्वस्तांना करण्यात आली आहे.