सतत नामजप करणार्या, समाधानी आणि कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणार्या कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील कै. श्रीमती विठाबाई दिगंबर म्हेत्रे !
‘१.३.२०२४ या दिवशी दुपारी ४.३० वाजता कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील श्रीमती विठाबाई दिगंबर म्हेत्रे (वय ८३ वर्षे) यांचे निधन झाले. म्हेत्रेआजींचे कुटुंबीय आणि साधक यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. मधुकर म्हेत्रे (वय ६१ वर्षे) आणि सौ. सुनीता मधुकर म्हेत्रे (वय ५९ वर्षे) (आजींचा थोरला मुलगा आणि सून)
१. ‘आई सर्वांना समान वागणूक आणि प्रेम द्यायची. तिने कधीही भेदभाव केला नाही.’
सौ. आदिती जगताप (श्री. मधुकर म्हेत्रे यांची मोठी मुलगी, आजींची नात), पुणे
१. देवाची आवड : ‘आजीला देवाची पुष्कळ आवड होती. ती काम करतांनाही नामजप करत असे. ती उठता बसता ‘गुरुमाऊली गुरुमाऊली’ असे सतत म्हणत असे. आजी एकादशी, संकष्टी चतुर्थी, रविवार या दिवशी उपवास करायची.
२. साधना केल्यामुळे आजीमध्ये पुष्कळ पालट झाले होते. तिचा चेहरा समाधानी दिसायचा.
३. साधनेचे महत्त्व लक्षात येणे : ‘स्वभावाला औषध नाही’, असे ऐकले होते. ‘कुणी कितीही स्वभावदोषयुक्त असले, तरीही साधना आणि प्रामाणिक प्रयत्न असले की, देव जवळ करतो’, याची प्रचीती आजीमुळे आली. ‘जीवनाचा काहीही भरोसा नसल्याने आपण नेहमी नाम घेत रहावे’, असे ती मला सांगायची.’
४. मृत्यूनंतर
अंत्यसंस्कार ते १३ व्याचे विधी होईपर्यंत आमच्या घरातील वातावरण चांगले होते. ‘घरात मृत्यूनंतरचे विधी होत आहेत’, असे आम्हाला वाटत नव्हते. मला हलके वाटत होते.’
सौ. अबोली काळपांडे (श्री. मधुकर म्हेत्रे यांची दुसरी मुलगी, आजींची नात), पुणे.
१. घरकामात साहाय्य करणे : ‘माझी आई नोकरी करत असल्यामुळे आईला आजीचे पुष्कळ साहाय्य होत असे. आजी सकाळी ६ वाजता उठून घर झाडणे, स्वंयपाक घरातील कामे करणे, इतर कामे करत असे. आजी घरातील कामे रात्री ८.३० वाजेपर्यंत न थकता करत असे.’
कु. ओंकार मधुकर म्हेत्रे (श्री. मधुकर म्हेत्रे यांचा मुलगा, आजींचा नातू), पुणे.
१. प्रेमभाव : ‘कै. म्हेत्रेआजी हसतमुख होत्या. त्यांना कुणी भेटले की, आनंद व्हायचा. घरातील कोणीही लहान-मोठे पुष्कळ दिवसांनी भेटले की, आजी त्यांना मिठी मारून मायेने डोक्यावरून हात फिरवायच्या.’
श्री. मुकुंद म्हेत्रे (वय ५९ वर्षे) (आजींचा धाकटा मुलगा) कोरेगाव, जिल्हा सातारा.
१. ‘आई अशिक्षित असूनही आम्ही भावंडांनी शिकावे आणि आमच्यावर चांगले संस्कार व्हावे’, यांसाठी तिने प्रयत्न केले.
२. आई प.पू. डॉक्टरांचा धावा सतत करत असे. तिच्या मुखातून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप सतत ऐकू येत असे.
३. आई ‘व्यवहार आणि साधना यांची सांगड घालून अधिकाधिक साधना कशी होईल ?’, याकडे कटाक्षाने लक्ष देत असे. त्यामुळे मृत्यूपूर्वी होणार्या शारीरिक त्रासांना तिला सहजपणे सामोरे जाता आले. आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मृत्यूनंतर तिचा चेहरा प्रसन्न जाणवत होता. अंत्यविधी ते तेराव्याच्या विधीपर्यंत हलकेपणा जाणवत होता.
४. साईभक्त आणि सूक्ष्मातून जाणणारे आमचे नातेवाईक श्री. राजेंद्र माळी (टेंभुर्णी, जिल्हा सोलापूर) यांनी ‘आई पुण्यात्मा असल्याने तिचा पुढचा प्रवास योग्य दिशेने चालू आहे’, असे सांगितले.
५. गरुड पुराणाची सांगता करत असतांना लादीवर ॐ सारखी आकृती उमटली होती.’
सौ. छाया म्हेत्रे (आजींची धाकटी सून), कोरेगाव, जिल्हा सातारा.
१. सेवेसाठी साहाय्य करणे : ‘आईंनी मला सेवेला जातांना कधीच अडवले नाही. मी प्रतिदिन ५ ते ६ घंटे सेवेसाठी बाहेर जायची; पण त्यांनी कधीच गार्हाणे केले नाही. मी घरी काम करत असतांना अकस्मात् कुणी सेवेला बोलावले, तर त्या मला म्हणायच्या, ‘‘तू सेवेला जा. मी राहिलेली कामे करते.’’
२. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर व्यसन सुटणे : आईंना तंबाखूचे व्यसन होते. एकदा आम्ही त्यांना तपोधाम येथे घेऊन गेलो. ‘तिथे तंबाखू नेलेला चालत नाही’, असे त्यांना सांगितल्यावर त्या तंबाखू न घेता तपोधाम येथे आल्या. तिथे त्यांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास शिकवले; परंतु त्यांना नामजप करता येत नसे. आश्रमातील साधकांनी त्यांना नामजपाची आठवण करून दिली आणि त्यांच्याकडून नामजप करून घेतला. त्या एक मासात नामजप करायला शिकल्या. त्या अखंड नामजप करू लागल्यावर त्यांचे तंबाखूचे व्यसन सुटले.
३. आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे : आई कामात व्यस्त असायच्या, तरीही मधेमधे कापूर आणि अत्तर यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे, प्रार्थना करणे आणि नामजप करणे इत्यादींत त्यांचे सातत्य असायचे.
४. सेवेची तळमळ : आईंना लिहिता वाचता येत नव्हते, तरीही त्या साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करायच्या. घरात कोणी नसले, तरी त्या सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण करायच्या. त्या वस्तू घेणार्या जिज्ञासूंना कागद पेन देऊन ‘तुमचे नाव, दूरध्वनी क्रमांक, घेतलेल्या वस्तू आणि पैसे लिहा अन् सुट्टे पैसे द्या’, असे सांगत. संध्याकाळी मी घरी आल्यावर त्या ‘हिशोब योग्य आहे का ?’, हे पडताळून घेत. ‘हिशोब बरोबर आहे’, असे म्हटल्यावर त्यांना आनंद व्हायचा. त्या दुपारी मोकळ्या वेळेत येणार्या-जाणार्या व्यक्तींना बोलावून वस्तूंची माहिती देत आणि वितरण करत. सेवा झाल्यावर त्या ‘डॉ. बाबांनी (प.पू. डॉ. आठवले यांनी) सेवा करून घेतली’, असे म्हणत.
५. मृत्यूपूर्वी
आई मला सतत हाक मारायच्या. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मला सतत हाका मारण्याऐवजी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करा.’’ तेव्हा त्यांनी मला हाका मारणे बंद करून दत्ताचा नामजप अधिक केला.
६. आईंच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे
अ. त्यांचा चेहरा तेजस्वी वाटत होता.
आ. मृत्यू होऊन १८ घंटे झाले होते, तरीही ‘त्या जिवंत आहेत’, असे जाणवत होते. त्यांचे हात आणि पाय यांची घडी घालता येत होती.
इ. ‘घरात कुणाचा मृत्यू झाला आहे’, असे वाटत नव्हते, तर चैतन्य जाणवत होते. घरी येणार्या साधकांनाही तसेच वाटत होते.’
कु. मंजुषा म्हेत्रे (श्री. मुकुंद म्हेत्रे यांची मुलगी, आजींची नात), सातारा.
१. देव आणि गुरु यांच्याप्रती भाव : ‘आजीची प.पू. भक्तराज महाराज, प.पू. डॉ. आठवले आणि देवता यांच्यावर अतिशय श्रद्धा होती, तसेच त्यांच्याप्रति भाव होता. आजी मला नेहमी सांगायची, ‘प.पू. भक्तराजबाबा झोपाळ्यावर बसले आहेत. गणपति माझ्याकडे बघून हसत आहे.’ तिला वेळोवेळी देवतांचे दर्शन होत होते.
२. व्यवस्थितपणा : ‘आजीला आपले घर स्वच्छ आणि व्यवस्थित असावे’, असे वाटायचे. ती कपडे आणि साहित्य व्यवस्थित ठेवायची.
३. पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर चैतन्य जाणवणे : आजीच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर तिथे मला पिवळ्या रंगाचे चैतन्य दिसत होते. ‘अग्नीच्या धुरात चैतन्य पसरत आहे’, असे मला जाणवत होते.’
श्री. शरद शिंदे (साधक), कोरेगाव, जिल्हा सातारा.
‘आजी सतत परेच्छेने वागायच्या आणि सतत ईश्वराच्या अनुसंधानात असायच्या’, असे मला जाणवायचे. आजींकडे पाहिल्यावर प्रसन्न वाटत असे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २०.९.२०२४)
|