पाणीपट्टी कर न भरल्याने मुळशी प्रादेशिक योजनेतील २१ ग्रामपंचायतींचे पाणी बंद !
माले (जिल्हा पुणे) – मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींना मुळशी धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. ग्रामपंचायतींकडून जमा होणार्या पाणीपट्टीवर ही योजना चालवण्यात येते. २१ ग्रामपंचायतींची मिळून सप्टेंबरपर्यंत २ कोटी २७ लाख रुपयांचा पाणीपट्टी कर थकला आहे. त्यामुळे महावितरणचे विद्युत् देयकही थकले आहे. महावितरणने गेल्या २ दिवसांपासून या योजनेचा विद्युत् पुरवठा खंडित केल्याने मुळशी प्रादेशिकचा सर्व २१ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. अनेक ग्रामस्थांना पिण्याचे पाणी दुकांनामधून विकत घ्यावे लागत आहे.
मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी घेणार्या ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी कर वेळेत भरावा, तसेच कर न भरणार्या ग्रामपंचायतींवर पाणी बंद करण्याची कारवाई व्हावी. या योजनेअंतर्गत पाण्याच्या पाईपलाईनला गावनिहाय व्हॉल्व्ह बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)