श्री गुरु स्वामी असतांना, धरू का भीती मरणाची ।’, ही प.पू. भक्तराज महाराज यांची भजनपंक्ती प्रत्यक्षात आचरणात आणणारे श्री. मधुसूदन कुलकर्णी !
‘श्री. मधुसूदन कुलकर्णीकाका (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६१ वर्षे) सेवेच्या निमित्ताने उत्तरप्रदेशातील मथुरा आणि अयोध्या येथे गेले होते. त्या वेळी त्यांची प्रकृती अकस्मात् बिघडली. त्यांचा रक्तदाब २२७/११६ mm Hg, इतका वाढला आणि नाडीचे ठोके ४० प्रती मिनिट, इतके अल्प झाले. (‘सर्वसाधारणपणे निरोगी व्यक्तीचा रक्तदाब १२०/८० mm Hg, इतका असतो आणि नाडीचे ठोके ६० ते ८० प्रती मिनिट, इतके असतात.’ – संकलक) त्यामुळे त्यांना उभे रहाणेही कठीण होत होते; पण त्यांच्या चेहर्यावर चिंतेचा लवलेशही नव्हता. एकदा त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यामुळे आधुनिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयातही भरती करावे लागले. आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘नाडीचे ठोके ४० प्रती मिनिट, इतके अल्प होणे, म्हणजे जिवाला धोका आहे’’, तरीही काका स्थिर होते.
आधुनिक वैद्यांनी दिलेली औषधे घेण्यासह काका संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय श्रद्धेने उपाय पूर्ण करत असत. ‘गुरुसेवेची अफाट तळमळ’ आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांवरील श्रद्धा’, यांमुळे सेवेला जाण्याच्या वेळी त्यांची प्रकृती ठीक होत असे. एवढ्या कठीण स्थितीतही सेवा हेच त्यांचे प्राधान्य असल्यामुळे ते अखंड सेवारत रहाण्याचा प्रयत्न करत होते. ते त्रासाला घाबरले नाहीत आणि त्यांची श्री गुरूंवरील श्रद्धा डळमळीत झाली नाही. ‘शारीरिक त्रास होत असल्यामुळे सेवा थांबवून रामनाथीला येता का ?’, असे काकांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘श्री गुरूंनी मला सेवेसाठी इकडे पाठवले आहे. त्यामुळे मला काही होणार नाही. मला शारीरिक त्रासांची भीती वाटत नाही. मला शक्ती देणारे गुरुच आहेत, तर मी चिंता कशाला करू ? गुरूंच्या आशीर्वादाने माझी प्रकृती बरी होईल. प्रकृती सांभाळून मी जमेल तशी सेवा करीन; मात्र सेवा पूर्ण करूनच परत येईन.’’ त्याप्रमाणे काका सेवा पूर्ण करूनच रामनाथीला आले.
श्री. मधुसूदन कुलकर्णी यांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘श्री गुरु स्वामी असतांना, धरू का भीती मरणाची ।’, या भजनपंक्तीप्रमाणे शारीरिक त्रासांना न घाबरता अविरतपणे गुरुसेवा करण्याचा आदर्श साधकांसमोर ठेवला आहे. देह प्रारब्धावरी सोडून त्यांनी त्यांचे चित्त गुरुसेवेशी जोडले आहे. त्यामुळे श्री गुरूंनीच त्यांना चैतन्यरूपी ऊर्जा देऊन त्यांच्याकडून गुरुसेवा करून घेतली.
साधकांनो, श्री. मधुसूदन कुलकर्णी यांच्याप्रमाणे ‘आपली सर्वतोपरी काळजी घेणारे श्री गुरुच आहेत’, अशी श्रद्धा ठेवून कठीण प्रसंगावर मात करा आणि गुरुकृपा अनुभवा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१८.१०.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |