थोडक्यात महत्त्वाचे

भावेश भिंडे याला जामीन संमत !

मुंबई – घाटकोपर येथील महाकाय फलक दुर्घटनेप्रकरणी अटकेतील ‘इगो मिडिया’चा मालक भावेश भिंडे याला सत्र न्यायालयाने जामीन संमत केला. त्याने अटकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, तसेच ‘अटक बेकायदा ठरवून तातडीने जामिनावर सुटका करण्याचे आदेश द्यावेत’, अशी मागणीही केली होती; मात्र ही अटक कायदेशीर असल्याचे सांगत न्यायालयाने याचिका फेटाळली. त्यानंतर भिंडे याने पुन्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी याचिका केली. या वेळी त्याला जामीन संमत करण्यात आला.


‘लिव्ह इन’मध्ये रहाणार्‍या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न !

(प्रतिकात्मक चित्र)

मुंबई – कुर्ला येथे ३५ वर्षांची महिला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये मित्रासमवेत रहाते. वाद झाल्याने संतापाच्या भरात तिने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मित्राने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तिला रोखले. तिचे समुपदेशन करण्यात आले.


६४ लाख रुपयांचा मद्यसाठा, गुटखा जप्त

नाशिक – आचारसंहिता लागू झाल्यापासून नाशिक ग्रामीण पोलिसांनी ३ दिवसांच्या कारवाईत मद्यसाठा, गुटखा यांसह ६४ लाख ३४ सहस्र २७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


मद्यपी पर्यटकांनी महिलेला चिरडले !

रायगड – हरिहरेश्वर येथे पुणे येथील पर्यटकांनी मद्याच्या नशेत धिंगाणा केला. मद्यधुंद अवस्थेत वसतीगृहाच्या मालकास मारहाण केली, तसेच मालकांची बहीण ज्योती धामणस्कर हिला स्कॉर्पियो वाहनाखाली चिरडले. यात तिचा मृत्यू झाला. यानंतर पर्यटक फरार झाले. खोलीच्या भाड्यावरून पर्यटकांनी हा प्रकार केला. एकाला कह्यात घेतले असून फरार पर्यटकांचा शोध चालू आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू असल्याचे समजते.


चांदवड येथे ढगफुटीसदृश्य पाऊस

नाशिक – येथील चांदवड शहर आणि परिसरात परतीच्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे रस्त्यावर गुडघ्याइतके पाणी झाले. पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे दुचाकी आणि चारचाकी गाड्या वाहून गेल्या. काही जनावरेही वाहून गेली.

मका, कांदा, सोयाबीन या पिकांना मोठा फटका बसला.