रामनाथी, गोवा येथील आश्रमात आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या सत्संगात साधिकेला आलेल्या अनुभूती
‘मी काही दिवसांसाठी वाराणसी येथून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. आश्रमातील वास्तव्यात मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या सत्संगात आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे ‘स्वयंपाकगृहात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया अन् सेवा केल्यामुळे शीघ्र आध्यात्मिक प्रगती होते’, हे अनुभवता येणे
आश्रमातील स्वयंपाकगृहात ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन शीघ्रतेने होते’, हे मला अनुभवता आले. येथे सांगितलेली सेवा त्वरित स्वीकारली, तर विचार आणि आध्यात्मिक त्रास यांनी शिणलेल्या मनाचा त्याग होऊन पुष्कळ लाभ होतो. येथे सेवा केल्यावर मला केवळ ३० मिनिटांतच हे लाभ अनुभवता आले. त्यामुळे ‘येथे प्रतिदिन ३ – ४ घंटे सेवा केली, तर साधकांमध्ये आंतरिक पालट होण्याचे प्रमाण गतीने वाढते’, हे लक्षात आले. गुरुदेवांनी सांगितले आहे, ‘स्वयंपाकगृहात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया अन् सेवा केल्यामुळे शीघ्र आध्यात्मिक प्रगती होते.’ हे सूत्र मला अनुभवता आले.
२. मनाला अंतर्मुख करणारा व्यष्टी साधनेचा आढावा
अ. सौ. वैजयंती विनयकुमार (पूर्वाश्रमीची कु. वृषाली कुंभार) ही साधिका साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेते. तेव्हा ती अत्यंत प्रेमाने साधकांच्या मनाच्या विचारप्रक्रियेचा अभ्यास करून घेते. त्यामुळे मनाची सहजतेने शुद्धी होऊ लागून ‘अंतर्मुख होणे’ हा गुण साधकांमध्ये येतो.
आ. आढाव्यात स्वतःकडून झालेल्या चुकांवर भावाचे दृष्टीकोन ठेवून उपाययोजना काढण्यास सांगितले जाते. तेव्हा ‘त्या चुकांरूपी पापांचे क्षालन होते’, असे अनुभवायला येते आणि स्वतःला हलकेपणा जाणवतो.
३. महाप्रसाद ग्रहण करतांना मन संतुष्ट होऊन श्री गुरुकृपेने त्यातील चैतन्य अनुभवता येणे
महाप्रसाद किंवा प्रसाद घेतांना प्रसन्नतेचा अनुभव येतो. इतर वेळी जेव्हा आपण घाईघाईत भोजन करतो, तेव्हा ते केवळ भोजनच असते आणि त्यामुळे शरिराला जडपणा जाणवतो. प्रार्थना करून, नामजप करत प्रसाद किंवा महाप्रसाद ग्रहण केल्यास स्वतःला हलकेपणा जाणवतो. जिभेच्या स्वादिष्टतेचा त्याग होऊन मनाला संतुष्टतेची अनुभूती येते. ‘अखंड नामजप करत बनवलेल्या भोजनात केवढे चैतन्य असते’, हे केवळ श्री गुरुकृपेनेच अनुभवता येते. त्यासाठी मी गुरुदेवांच्या श्री चरणी कृतज्ञ आहे.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा सत्संग
४ अ. गुरुदेवांच्या सत्संगापूर्वीचे खोलीतील वातावरण
१. तेथील वातावरण निर्विचार, हलके, शांतीपूर्ण आणि स्थिर वाटले.
२. ‘गुरुदेव प्रत्येक कानाकोपर्यात आणि प्रत्येक वस्तूमध्ये सामावलेले आहेत’, असे मला जाणवत होते.
४ आ. भावजागृती करणारी गुरुदेवांची भेट
१. गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर ‘ईश्वर भक्तासमोर प्रगट होतो, त्या वेळी भक्ताची अवस्था निर्विचार, शून्य आणि ईश्वरमय होऊन जाते’, असे वाटून माझीही अवस्था तशीच झाली.
२. श्रीकृष्ण स्वत:च्या मुरलीच्या सुरांनी गोपगोपी, वृक्ष, झाडे, पशू-पक्षी आणि संपूर्ण वनस्पती यांना मोहून टाकतो. त्या वेळी ‘श्रीकृष्णाच्या समीपच रहावे’, अशी सर्वांची अवस्था होते. अगदी तशीच स्थिती आमचीही झाली होती.
३. ‘डोळ्यांच्या पापण्यांची एकदाही उघडझाप न करता केवळ गुरुदेवांकडे एकटक पहात रहावे, त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे मला वाटत होते.
४. ‘गुरुदेवांच्या दर्शनाने मला सर्व देवतांचे दर्शन झाले आणि अन्य कुठे जाण्याची किंवा काही मिळवण्याची इच्छा न होता ‘त्यांच्या चरणी लीन होऊन रहावे’, असे प्रयत्न करण्याची भक्ती जागृत झाली.
५. ‘चैतन्य, आनंद आणि कृतज्ञता यांच्या आशीर्वादाने माझी झोळी भरून गेली आहे’, अशी माझी स्थिती झाली.’
– सुश्री (कु.) सुनिता छत्तर, वाराणसी सेवाकेंद्र, वाराणसी.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |