महापालिकेने पुणे शहरातील अभ्यासिकांचे अग्नीसुरक्षा-परीक्षण करण्याची मागणी !
पुणे – शहरांमध्ये अनेक इमारती, जुन्या वाड्यांमध्ये लहान-मोठ्या अभ्यासिका चालू आहेत. अभ्यासिकेत घडणार्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील प्रत्येक अभ्यासिकेचे अग्नीसुरक्षा-परीक्षण (फायर ऑडिट) करण्याची मागणी ‘युवा सेने’चे सहसचिव कल्पेश यादव यांनी केली आहे. यावर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाची चेतावणी दिली आहे.
महापालिकेला दिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, गांजवे चौक परिसरातील अभ्यासिकेला आग लागून अभ्यासिकेतील भ्रमणसंगणक (लॅपटॉप), पुस्तके, आसंद्या आदी साहित्य जळून गेले आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर येत आहे. विविध राज्यांतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात येत असतात. त्याला अपलाभ घेत अनेकांनी अभ्यासिकेचा व्यवसाय चालू केला आहे. अभ्यासिकेचे शुल्क घेतात; परंतु कोणतीही चांगली सुविधा दिली जात नाही. त्यामुळे शहरातील प्रत्येक अभ्यासिकेचे लेखापरीक्षण महापालिकेने करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका :अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? |